उन्हाळी पावसानेे जिल्ह्याला झोडपून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:35+5:302021-06-04T04:20:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्याला गुरुवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. मान्सूनच्या आगमनापूर्वीच जिल्हा चिंब झाला. दुपारी तीन वाजल्यापासून ...

Summer rains lashed the district | उन्हाळी पावसानेे जिल्ह्याला झोडपून काढले

उन्हाळी पावसानेे जिल्ह्याला झोडपून काढले

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्याला गुरुवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. मान्सूनच्या आगमनापूर्वीच जिल्हा चिंब झाला. दुपारी तीन वाजल्यापासून ठिकठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली.

सांगलीत साडेतीन वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारपासूनच काळ्याभोर ढगांनी जिल्ह्याच्या आकाशात गर्दी केली होती. चारपासून शहरात संततधार सुरु झाली. तासभर दमदार बॅटिंग केल्यानंतर संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले. मिरज शहरातही दमदार पाऊस झाला. मार्केट परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली होती. मिरज पूर्व भागात टाकळी, एरंडोली, आरग, बेडग भागात चांगला पाऊस झाला.

वाळवा आणि इस्लामपूरलाही धुवाॅंधार पावसाने झोडपून काढले. इस्लामपुरात चार वाजल्यापासून सुमारे तासभर पाऊस कोसळला. वाळव्यात ओढे, नाले भरुन वाहिले. शिराळ्यातही तीन वाजल्यापासून जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव येथे हलका पाऊस झाला. कवठेमहांकाळमध्ये पाच वाजता पाऊस सुरु झाला. पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली. विटा, पलूसकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. ढग दाटले, मात्र पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र सुरु होण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले. मशागती केलेली शेते आता पेरणीसाठी तयार झाली आहेत.

Web Title: Summer rains lashed the district