पाणीपट्टी भरल्यानंतरच उन्हाळी आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:32+5:302021-02-05T07:31:32+5:30
ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या एकूण वीजबिलाच्या ८१ टक्के रक्कम कृष्णा खोरे महामंडळाने भरायची आहे. उर्वरित १९ टक्के ...

पाणीपट्टी भरल्यानंतरच उन्हाळी आवर्तन सुरू
ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या एकूण वीजबिलाच्या ८१ टक्के रक्कम कृष्णा खोरे महामंडळाने भरायची आहे. उर्वरित १९ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकडे भरली आहे. पण, उर्वरित काही शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्यामुळे महावितरणची थकीत वीजबिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृष्णा खोरे आणि टंचाई निधीतून पैसे आले आहेत. यामुळे पूर्वीच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न सुटणार आहे. पण, सिंचन योजना नियमित चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर पाणीपट्टी भरण्याची गरज आहे. सध्या जत, कवठेमहांकाळ आणि मरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. सध्या ताकारी-म्हैसाळ सिंचन योजनेची १६ कोटी १८ लाख २५ हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे. म्हणून ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. मा. नलवडे यांनी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळी हंगामाची पाणीपट्टी प्रतिदशलक्ष घनफूट तीस हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरण्याचे आवाहनही नलवडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांकडून पाणी मागणीचे अर्ज दि. ५ फेब्रुवारीपासून भरून घेण्यात येत आहेत. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडे पाणी मागणीचे अर्ज भरून द्यावेत, त्यानंतरच पाणी सोडण्यात येणार आहे, असेही नवलडे यांनी स्पष्ट केले.