सुमनतार्इंचे नागपुरात उपोषण
By Admin | Updated: December 16, 2015 00:14 IST2015-12-15T23:49:04+5:302015-12-16T00:14:13+5:30
मागण्यांसंदर्भात आज बैठक : गिरीश बापट यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

सुमनतार्इंचे नागपुरात उपोषण
तासगाव : ताकारी, म्हैसाळ, आरफळसह अन्य पाणी योजना सुरू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह काही आमदारांनी मंगळवारी नागपूर येथे विधानभवनासमोर उपोषण केले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.पाणी योजना सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह गणपतराव देशमुख, जयंत पाटील, विद्या चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. अजित पवार, कपिल पाटील यांनी उपोषणास पाठिंंबा दिला. ताकारी, म्हैसाळसह आरफळ योनजेचे पाणी चालू करा, या योजनांचे वीज बिल टंचाईतून भरा, या योजनेची थकबाकी माफ करा, तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील मटका व अवैध धंदे बंद करा, राज्यात डान्स बार बंदी कायम करण्याचा कायदा करा, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.
संसदीय कार्यमंत्री बापट यांनी सभागृहाबाहेर येऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत विचारणा केली. त्यावर गुरुवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, योजना सुरु करण्यासाठी शासन ठोस निर्णय घेईल, असे बापट यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे बापट यांना सांगितले. (वार्ताहर)
तासगावकर पाठीशी : आज उपोषण
आमदार सुमनताई पाटील यांनी, तालुक्यातील पाणी योजना तातडीने सुरु व्हाव्यात, या मागणीसाठी नागपुरात विधानभवनासमोर उपोषण केले. त्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तासगावात दि. १६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा हे वाजता उपोषण करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन तहसीलदार सुधाकर भोसले यांना देण्यात आले असल्याची माहिती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी दिली.