आबांच्या जागी सुमनताईच
By Admin | Updated: March 15, 2015 00:30 IST2015-03-15T00:27:55+5:302015-03-15T00:30:39+5:30
तासगाव : निवडणूक बिनविरोध करा : अजितदादा

आबांच्या जागी सुमनताईच
तासगाव : विधानसभेच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई पाटील याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी तासगावात केली. आर. आर. आबांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू असल्याने अन्य पक्षांनी येथे उमेदवार देऊ नये, असे आवाहनही पवार यांनी केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्ही बीडमध्ये उमेदवार दिला नाही. लोकांनी त्यांना पाच वर्षांसाठी निवडले होते. तसेच येथेही आबांना पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. तेव्हा भाजप, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, रासप, आरपीआय, शेतकरी संघटना या सर्व राजकीय पक्षांना उमेदवार न देण्याबाबत विनंती असून, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे पवार यांनी सांगितले.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तासगावात शनिवारी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, यावेळी पवार बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीप पाटील, डी. के. पाटील, विजय सगरे, हणमंतराव देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सकाळपासून मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांशी आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच सुमनतार्इंच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आज दु:खद अंत:करणाने निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. कार्यकर्त्यांनी आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून काम केले पाहिजे. यापुढच्या काळात या मतदारसंघातील घडामोडींकडे आपले कटाक्षाने लक्ष राहील. हा कसोटीचा काळ आहे. पदाधिकाऱ्यांनी यापुढे जास्त वेळ दिला पाहिजे. स्वच्छ मन ठेवा. हलक्या कानाचे राहू नका. एकोप्यात कशी फूट पडेल यासाठी विरोधक काम करतील, पण आपण एकसंघ असायला हवे. पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत असते, पण यावेळी दुर्लक्ष न करता कार्यकर्त्यांनी काम करावे.
आर. आर. आबांच्या जाण्याने मतदारसंघ पोरका झाला असे नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख आमदार तासगाव-कवठेमहांकाळसाठी वेळ देणार आहेत. मतदारसंघात राहिलेली विकासकामे, सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
आ. जयंत पाटील म्हणाले की, यापुढच्या काळात लोकांच्या हितासाठी संघटना बळकट होणे गरजेचे आहे. शनिवारी तासगावात कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने चर्चा झाली. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यातच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पक्षाला लवकरच निर्णय घेणे गरजेचे होते, म्हणूनच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आ. हसन मुश्रीफ म्हणाले की, आर. आर. आबा म्हणजे आमच्या पक्षाचा चेहरा होता. त्यांनी आयुष्यभर आदर्शवाद जपण्याचा प्रयत्न केला.
तालुकाध्यक्ष हणमंत देसाई यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)
संजयकाका-घोरपडे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
विधानसभेच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये मात्र मतभिन्नता असून, खा. संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी शनिवारी कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन उद्या, सोमवारी पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा निर्णय
जाहीर केला.
शेकाप, स्वाभिमानी, ‘मनसे’चाही पाठिंबा
४कवठेएकंद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन तालुका चिटणीस भाई सूर्यकांत पाटील यांनी सुमनताई पाटील यांना शेकापचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
४स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पोटनिवडणूक लढविणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
४या निवडणुकीत सुमनतार्इंना पाठिंबा देण्यासाठी ‘मनसे’चा उमेदवार देणार नसल्याचे ‘मनसे’च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पत्रही मिळाले आहे.
दोन महिन्यांतून
एकदा येणार
येथील प्रश्न समजून घेण्यासाठी दर दोन महिन्यांनी तासगावला येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आबांनी उभ्या केलेल्या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था उत्तम चालल्या पाहिजेत. जर पदाधिकाऱ्यांनी गडबड केली, तर अध्यक्षांचा राजीनामा घेणार असल्याचे खडे बोल त्यांनी सुनावले.