सलगरे, चाबुकस्वारवाडी ‘म्हैसाळ’च्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: May 25, 2015 00:28 IST2015-05-25T00:12:52+5:302015-05-25T00:28:30+5:30

३०० हेक्टर पिके संकटात : पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

Sulgre, waiting for 'Chhukswarwari' Mhasal ' | सलगरे, चाबुकस्वारवाडी ‘म्हैसाळ’च्या प्रतीक्षेत

सलगरे, चाबुकस्वारवाडी ‘म्हैसाळ’च्या प्रतीक्षेत

दादा खोत - सलगरे -सलगरे व चाबुकस्वारवाडी ही मिरज पूर्व भागातील शेवटची गावे. म्हैसाळ योजनेच्या पाणी क्षेत्रात या गावांचे जवळजवळ ८० टक्के क्षेत्र पाण्याखाली आहे. सलगरे-चाबुकस्वारवाडी ओढ्यामधून या चार वर्षांपासून पाणी सोडल्याने सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रात आले आहे. पंपगृह सुरू होऊन महिना उलटून गेला तरी सलगरे, चाबुकस्वारवाडीत पाणी मिळालेले नाही.
ओढ्याला पाणी सोडल्याने चार किलोमीटर ओढ्याच्या परिसरामध्ये ऊसशेती व द्राक्षशेती, भाजीपाला लागवड आदी पिकांचे क्षेत्र वाढले. साहजिकच नैसर्गिकरित्या ओढ्याचा वापर ‘म्हैसाळ’च्या पाणी वहनासाठी झाला. या परिसरामध्ये ओढ्याला बंधारे आदी जलसिंचनाची कामे झाली. सर्वांत जास्त विहिरींची संख्या ही याच पट्ट्यात आहे. त्यामुळे या ओढ्याला ‘म्हैसाळ’चे पाणी येणार, या आशेने लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या लाभक्षेत्रामध्ये केली. परंतु पाणी सोडून महिना लोटला तरी या चार किलोमीटर नैसर्गिक परिस्थिती असलेल्या व बागायत क्षेत्र असलेल्या भागाला अजूनही क्षमतेने पाणी सोडले नसल्याने, या परिसरातील ऊसशेती, द्राक्षशेती व भाजीपाला शेती ही पिके संकटात आली आहे, तर काहींच्या उसाला त्याचा फटका बसला आहे.
ओढ्यातून पाणी सोडण्यासाठी गेट क्र. १ व २ मधून पाणी सोडल्यास या लाभक्षेत्रातील ४०० हेक्टरपर्यंतचे क्षेत्र पाण्याखाली येते. परंतु हे क्षेत्र सलगरे लाभक्षेत्रांतर्गत असल्याने या गेटमधून पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
या लाभक्षेत्राला पाणी सोडण्यासाठी वारंवार मागणी अर्जाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली आहे. अगोदरच अवकाळी व हवामानाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला या कृत्रिम पाणीटंचाई व मागणी अर्जाशिवाय पाणी नाही, या अधिकाऱ्यांच्या धोरणाचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरले आहेत. ऊसशेती व द्राक्षबागा वाचविण्यासाठी कूपनलिकांचा आधार शेतकरी घेत आहेत. परंतु भीषण पाणीटंचाईने पाणी पातळीच खालावली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भीषण पाणीटंचाईसंदर्भात ‘म्हैसाळ’च्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, आवर्तन मे महिन्यापर्यंत असल्याचे सांगत पाणी जतपर्यंत जाणार असून, मेमध्ये पाणी सोडले जाईल, असे त्याने सांगितले. पिके वाया गेल्यानंतर पाणी कशासाठी सोडणार? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

५० टक्के शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरल्याशिवाय पाणी सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरुन आॅफिसला सादर करावेत. ५० टक्के मागणी अर्जाची अट पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याची तयारी केली जाईल.
- एस. डी. बावचेकर,
सहायक अभियंता

Web Title: Sulgre, waiting for 'Chhukswarwari' Mhasal '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.