सुखसागर महाराज अनंतात विलीन

By Admin | Updated: December 1, 2014 00:03 IST2014-11-30T22:38:48+5:302014-12-01T00:03:56+5:30

भाविकांची गर्दी : अंत्ययात्रा, धार्मिक विधींनी आदरांजली

Sukasagar Maharaj merged the infinity | सुखसागर महाराज अनंतात विलीन

सुखसागर महाराज अनंतात विलीन

शिरशी : बांबवडे (ता. शिराळा) येथील धर्मसागर महाराज यांची तपोभूमी असलेल्या श्री क्षेत्र धर्मगिरी येथे १३ दिवसांपासून यमसल्लेखना घेतलेल्या प. पू. १0८ सुखसागर महाराज (वय ७२) यांच्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत व णमोकार महामंत्राच्या जयघोषात आज (रविवारी) सकाळी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू भीमगोंडा बाळगोंडा पाटील, भालचंद्र बाळगोंडा पाटील (भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराजांसह अकरा मुनीजनांनी भक्तीपठण केले.
रविवारी सकाळी प. पू. श्री १0८ सुखसागर महाराज यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. धर्मगिरी पायथ्याशी णमोकार मंत्रांच्या जपामध्ये आचार्य वर्धमान सागर महाराज, धर्मसागर महाराज, विद्यासागर, चंद्रप्रभ, सुमतीसागर, शांतिसागर, सुधर्म सागर, स्वभावसागर, सिध्दांतसागर, पार्श्वसागर आदी मुनींनी धार्मिक विधी केला. यानंतर सुखसागर महाराजांचे बंधू भीमगोंडा पाटील, भालचंद्र पाटील यांनी मंत्राग्नी दिला.
सुखसागर महाराजांच्या निर्वाणाचे वृत्त समजताच वाटेगाव, बांबवडे, टाकवे, कासारशिरंबे, इस्लामपूर, कासेगाव, आष्टा परिसरातील जैन श्रावक-श्राविका व इतर धर्मियांनीही दर्शनासाठी डोंगरावर गर्दी केली होती.
सुखसागर महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव शामगोंडा बाळगोंडा पाटील असे होते. त्यांनी मुनी होण्यासाठी १९८६ मध्ये आचार्य सुखसागर महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली, तर ऐलक दीक्षा २00९ मध्ये आचार्य १0८ सन्मतीसागर महाराज यांच्याकडून भेंडवडे येथे घेतली. तसेच कोथळी येथे आचार्य सन्मतीसागर महाराज यांच्याकडून २0१३ मध्ये नियम सल्लेखना घेतली.
१५ नोव्हेंबर २0१४ रोजी आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली. बांबवडे येथील धर्मगिरी क्षेत्रावर १७ नोव्हेंबर २0१४ पासून यमसल्लेखना घेतली होती. यानंतर १३ व्या दिवशी म्हणजेच शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी त्यांचे निर्वाण झाले.
अंत्ययात्रेवेळी धर्मगिरी क्षेत्राचे अध्यक्ष व वाळवा पं. स.चे सभापती रवींद्र बर्डे, राजीव बर्डे, आनंदराव धुमाळ, विश्वास पाटील, विजय राजमाने, तात्यासाहेब नेजकर, प्रकाश पाटील यांनी आदरांजली वाहिली. बांबवडे येथील वीराचार्य गु्रप, वीर सेवा दल, वाटेगाव, इस्लामपूर येथील जैन युवा मंच यांनी अंत्ययात्रेचे नियोजन केले. यावेळी सुकुमार पाटील, बबन पाटील, तेजपाल शेटे, जयकुमार शेटे, जितू शेटे, पिंटू शेटे, प्रवीण पाटील, संदीप शेटे, डॉ. अशोक शेटे, शीतल शेटे, प्रशांत शेटे, आशिष शेटे, सुनील शेटे, अशोक शेटे यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन बांधव व इतरधर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sukasagar Maharaj merged the infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.