जातपंचायतीने वाळीत टाकल्याने आत्महत्या
By Admin | Updated: May 16, 2015 00:04 IST2015-05-15T23:52:02+5:302015-05-16T00:04:21+5:30
मिरजेतील तरुणाचे कृत्य : पोलीस बंदोबस्त

जातपंचायतीने वाळीत टाकल्याने आत्महत्या
मिरज : मिरजेतील सुभाषनगर येथे लक्ष्मण अर्जुन गायकवाड (वय ३५) या तरुणाने शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत लक्ष्मण यांच्या भावाने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून कुंकूवाले समाजाच्या जातपंचायतीने गायकवाड कुटुंबाला वाळीत टाकल्याच्या कारणावरून लक्ष्मण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.शेतमजुरी करणारे लक्ष्मण गायकवाड यांनी घरात तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण यांचा लहान भाऊ राजेंद्र याने नात्यातीलच एका तरुणीशी दुसरा विवाह केला होता. जातपंचायतीला न विचारता राजेंद्र याने विवाह केल्याने पंचांनी या विवाहाला आक्षेप घेतला. त्यामुळे लगेचच एका दिवसात राजेंद्र याने घटस्फोट घेतला. जातपंचायतीच्या दबावाने घटस्फोट घ्यावा लागल्याने संबंधित तरुणीच्या पित्याने सहा पंचांविरुद्ध विवाहास आक्षेप घेऊन त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली होती. मात्र, या तक्रारीची चौकशी होण्यापूर्वीच राजेंद्र याचा मोठा भाऊ लक्ष्मण गायकवाड यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र याने दुसरा विवाह केल्यामुळे प्रकरण पोलिसांत गेल्याच्या कारणावरून पंचांनी धारेवर धरल्याने लक्ष्मण गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. आत्महत्येच्या घटनेनंतर मृत लक्ष्मण यांचा नातेवाईक नितीन मोरे यास काहीजणांनी मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. पंचायतीविरोधात तक्रार केल्याने मारहाण झाल्याची तक्रार (पान ९ वर)
नितीन मोरे यांनी पोलिसांत केल्यानंतर, मंगळवार पेठेतील कुंकूवाले गल्लीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आत्महत्येबाबत उलटसुलटचर्चा सुरू असताना, लक्ष्मण गायकवाड याने, ‘माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये’,
अशी चिठ्ठी लिहून ठेवल्याने आत्महत्येच्या कारणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. आत्महत्येबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे. (वार्ताहर)