शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या
By Admin | Updated: April 19, 2017 23:30 IST2017-04-19T23:30:27+5:302017-04-19T23:30:27+5:30
तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील शिवराम कृष्णा झांबरे (वय ६४) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 19 - तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील शिवराम कृष्णा झांबरे (वय ६४) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. सततच्या दुष्काळ व नापिकीला ते कंटाळले होते. त्यातच बॅंक, सोसायटीचे असलेले ३.५ लाख रुपये कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी मृत्यूला कवटाळले. हा प्रकार बुधवारी घडला. तासगाव पोलिसात रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील डोंगरसोनी गावातील शिवराम कृष्णा झांबरे मुलगा संपत व कुटुंबाबरोबर ते शेती करतात. त्यांची एक एकर द्राक्ष बाग आहे. त्याना गतवर्षी झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटीचा जबरदस्त फटका बसला होता. गारपीटीमुळे त्यांना गेल्या वर्षी दोनवेळा द्राक्ष छाटणी घ्यावी लागली होती. दुष्काळामुळे त्यांनी टँकरने पाणी घालून मोठ्या जिद्दीने त्यांनी द्राक्षबाग जोपासली होती.
द्राक्षबागेत शिवराम झांबरे कष्ट करत होते. परंतु यंदाही पाण्याची भीषण टंचाई व गतवर्षीच्या गारपीटीमुळे यंदा द्राक्षबागेला आलेली नापिकी त्यामुळे शिवराम झांबरे वैफल्यग्रस्त व गेले काही दिवस तणावात होते. त्यातच बॅंक, सोसायटीचे असलेले ३.५ लाख रुपये कर्ज कसे फेडायचे याची काळजी त्यांना सतावत होती. या तणावातच शिवराम यांनी आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबासह गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.