सफाई कर्मचाऱ्याची कर्जास कंटाळून मिरजेत आत्महत्या
By Admin | Updated: June 28, 2014 00:43 IST2014-06-28T00:39:02+5:302014-06-28T00:43:24+5:30
मिरज : मिरजेतील वैरण बाजार परिसरात महावीर ऊर्फ नाना कृष्णा होवाळे (वय ५०) या महापालिका सफाई कामगाराने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

सफाई कर्मचाऱ्याची कर्जास कंटाळून मिरजेत आत्महत्या
मिरज : मिरजेतील वैरण बाजार परिसरात महावीर ऊर्फ नाना कृष्णा होवाळे (वय ५०) या महापालिका सफाई कामगाराने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, शुक्रवारी सकाळी होवाळे यांनी घरातील स्वच्छतागृहात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती. कर्ज वसुलीसाठी तगादा लागल्याने ते गेले चार दिवस अस्वस्थ होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची कुटुंबीयांची तक्रार आहे.
महापालिकेच्या स्विपर्स कॉलनीत होवाळे कुटुंबीय राहतात. महावीर होवाळे यांची पत्नी वैशाली होवाळे याही महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. होवाळे यांना मद्यपानाची सवय होती. त्यासाठी त्यांनी काहीजणांकडून कर्ज घेतले होते. एलबीटीमुळे महापालिकेचा पगार अनियमित मिळत असल्याने कर्जाऊ दिलेल्या पैशांसाठी काहीजणांनी तगादा लावला होता. यामुळे गेले चार दिवस ते अस्वस्थ होते. कर्जाला कंटाळून आज सकाळी पत्नी कामावर गेल्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहात आत्महत्या केली.
होवाळे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या. एका चिठ्ठीत पत्नीस उद्देशून मुलांचा व्यवस्थित सांभाळ कर, असा मजकूर आहे, तर दुसऱ्या चिठ्ठीत कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. महापालिकेतील काही कर्मचारी खासगी सावकारी करीत असून, त्यांनी अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची सक्तीने वसुली करण्यात येते. गेले सहा महिने महापालिका कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याने खासगी सावकारीत वाढ झाली आहे. महावीर होवाळे या सावकारीचा बळी ठरल्याची तक्रार कुटुंबीयांनी केल्याने मिरज शहर पोलीस सावकाराचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)