नेत्यांच्या कलगीतुऱ्यात ऊस उत्पादक वाऱ्यावर
By Admin | Updated: April 1, 2015 00:01 IST2015-03-31T23:00:20+5:302015-04-01T00:01:35+5:30
दराचा प्रश्न कायम : जयंत पाटील, राजू शेट्टी, रघुनाथदादांचे आरोप-प्रत्यारोप

नेत्यांच्या कलगीतुऱ्यात ऊस उत्पादक वाऱ्यावर
अशोक पाटील-इस्लामपूर -राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा भर टाकत असून शेट्टी आणि जयंत पाटील नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे नेते आरोप-प्रत्यारोपातच गुरफटलेले आहेत. त्यांनी ऊस उत्पादकांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला २५०० ते २६०० रुपये दिल्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी लाटत आहेत, तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचाही पल्ला गाठला नाही, याचे खापर आमदार जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्यावर फोडले आहे. तथापि जयंत पाटील मात्र स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांना कोल्हापूरइतका दर देऊ शकलेले नाहीत, यावरून शेट्टी आणि त्यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गेले काही दिवस दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दुसरीकडे शेट्टी आणि जयंत पाटील हे ढोंगी नेते असून ऊस उत्पादकांच्या पायात साप सोडण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. ऊस दराबाबत दोघेही नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उसाला दर मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सर्वच सक्षम साखरसम्राटांनी पाने पुसली आहेत. ऊस उत्पादकांना राजू शेट्टी फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या जनमताचा आलेख ढासळत चालला आहे. त्याचा फायदा जयंत पाटील उठवत असले तरी, त्यांनीही स्वत:च्या कारखान्याचा दर कमी देऊन सभासदांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही सभासदांनी, जो कारखाना जादा दर देईल, तिकडे ऊस घालणे पसंत केले आहे.
या दोन्ही नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. परिणामी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा कमी दर मिळाल्याने या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर विश्वास ठेवण्यास ऊस उत्पादक तयार नाहीत.
राजू शेट्टी आणि जयंत पाटील हे संधिसाधू नेते आहेत. ऊस उत्पादकांना लुबाडणे हाच त्यांचा धंदा आहे. साखरसम्राटांना एफआरपीप्रमाणे दर देणे गेल्या १० वर्षांपासून जमले नाही. गत हंगामात राजू शेट्टी यांनी एफआरपी २६४० असताना २२०० रुपयांवर तडजोड करून ऊस उत्पादकांना मातीत घातले आहे. ऊस दराचे श्रेय लाटून लोकसभेला निवडून येण्याचा त्यांचा धंदा आहे, तर विधानसभेला जयंत पाटील यांना कसलाही विरोध न करता शेट्टी जुजबी प्रचार करतात. यामुळे या दोघांमध्ये नुरा कुस्ती होत असते.
- रघुनाथ पाटील, अध्यक्ष,
शेतकरी संघटना.