अशोक डोंबाळेसांगली : राजारामबापू साखर कारखान्याने प्रति टन तीन हजार २७५ रुपये जाहीर केला आहे. या दरापेक्षा जादा दराची घोषणा अन्य साखर कारखाने करण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे २०२४-२५ च्या गळीत हंगामात कारखान्याचा अंतिम दर तीन हजार २७५ पेक्षा जास्त जाणार नसल्याचे संकेत दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी लढ्यायचे तेच शांत असल्यामुळे शेतकरी संघटनांनीही कारखानदारांच्या भूमिकेवर संयमाची भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत पहिली उचल तीन हजार ७०० रुपयांची मागणी केली होती. या मागणीकडे साखर कारखानदारांनी पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे कारखानदार आणि संघटनेची बैठक बोलवण्याची मागणी केली. पण, गळीत हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरी प्रशासनाने बैठकच बोलवली नाही. बैठकीपूर्वीच राजारामाबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी प्रतिटन पहिली उचल तीन हजार २०० आणि दिवाळीनंतर ७५ रुपये मिळून ३,२७५ रुपये दराची घोषणा केली.
उर्वरित कारखान्यांचा सावध पवित्रा..सांगलीतील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडियानेही प्रतिटन तीन हजार १५० रुपये दराची घोषणा केली. अन्य साखर कारखान्यांनी दराची घोषणा करण्यापूर्वीच गळीत हंगाम सुरू केले आहेत. राजारामबापू कारखान्याने जी दराची घोषणा केली आहे, त्यापेक्षा जास्त अन्य कारखाने दर जाहीर करू शकतील, अशी परिस्थिती दिसत नाही.राजारामबापू कारखान्याकडेच वाटेगाव, साखराळे आणि जत असे एकूण चार युनिट आहेत. या कारखान्यांचा साखर उताराही चांगला आहे. तरीही, त्यांनी तीन हजार २७५ रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. उर्वरित सर्वच कारखाने सध्या ऊस दराची घोषणा करताना सावध पवित्रा घेत आहेत. यातच ऊस उत्पादक शेतकरीही शांत असून, ज्यांच्यासाठी लढायचे तेच शांत असेल, तर आंदोलनाचा उठाव कसा होणार, असा प्रश्न शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपीकारखाना - एफआरपी (रुपये)हुतात्मा (वाळवा) - ३१००राजारामबापू (साखराळे) - ३१००राजारामबापू (वाटेगाव) - ३१००राजारामबापू (कारंदवाडी) - ३१००राजारामबापू (तिपेहळ्ळी, जत) - २९००सोनहिरा (वांगी) - ३१७५दत्त इंडिया (सांगली) - ३१५०विश्ववासराव नाईक (चिखली) - ३१००क्रांती (कुंडल) - ३१००मोहनराव शिंदे (आरग) - ३०००दालमिया शुगर (करूंगळी) - ३१००सदगुरु श्री श्री (राजेवाडी) - २८५०उदगिरी शुगर (बामणी) - ३१००रायगाव शुगर (कडेगाव) - ३०००श्रीपती शुगर (डफळापूर) - ३०००यशवंत शुगर (नागेवाडी) - ३०००एसजीझेड ॲड् एसजीए शुगर (तुरची) - ३१५०
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटले : संजय कोलेपहिली उचलच व अंतिम दर असे अनेक कारखानदार करत आहेत. कारखान्यांनी तोडणी आणि वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकला आहे. हा खर्च परस्पर खर्ची टाकण्याचा प्रकार चुकीचा आहे. जेवढा तोडणी आणि वाहतुकीचा खर्च झाला, असेल तेवढेच वसूल झाले पाहिजे. तोडणी आणि वाहतुकीचा प्रतिटन ६०० ते ६२५ रुपये खर्च येत आहे. पण, प्रत्यक्षात कारखानदारांनी प्रतिटन ८९० ते ९४० रुपये खर्च दाखवून शेतकऱ्यांची लूट केली आहे. याला शासकीय लेखापरीक्षक आणि साखर आयुक्तही जबाबदार आहेत, अशी टीका शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी केली.
साखर उतारा, तोडणी, वाहतुकीतून भ्रष्टाचार : संदीप राजोबाजिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी साखर उतारा कमी दाखवून एफआरपी कमी केली आहे. तसेच तोडणी आणि वाहतूक खर्च प्रत्यक्ष खर्चाच्या ३० ते ४० टक्के जादा दाखवून साखर कारखानदार शेतकऱ्यांची लूट करत आहेत. साखर उतारा, काटामारी, तोडणी व वाहतुकीमध्ये कारखानदार कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करत आहेत. याकडे साखर आयुक्त आणि वैधमापन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.