कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील साखर वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST2021-08-21T04:31:44+5:302021-08-21T04:31:44+5:30
सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून साखरेची सर्व प्रकारची वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत थांबविण्याचा निर्णय वाहतूकदार संघटनांनी घेतला आहे. ...

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील साखर वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद
सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून साखरेची सर्व प्रकारची वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत थांबविण्याचा निर्णय वाहतूकदार संघटनांनी घेतला आहे. त्यातून रेल्वेची साखर वाहतूक वगळण्यात आली आहे. वाहतुकीची हमाली व अन्य खर्च मालकांनीच भरावी यासाठी वाहतूकदारांनी हा पवित्रा घेतला आहे.
कऱ्हाडमध्ये गुरुवारी (दि.१९) वाहतूकदार संघटनांची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय झाला. कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, कराड तालुका गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सोलापूर जिल्हा गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सांगलीतून स्वाभिमानी ट्रकमालक संघटना, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होेते. ‘साखऱ वाहतूक आणि समस्या’ या विषयावर चर्चा झाली. कोल्हापूरच्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले की, मालवाहतुकीदरम्यान भरणी, उतरणी, टपाल खर्च, चहापाणी, मुन्शियाना हा सर्व खर्च ट्रकभाड्यात समाविष्ट केला जातो. तो स्वतंत्ररित्या द्यावा, अशी मागणी सातत्याने करत आहोत. ज्याचा माल असेल, त्यानेच हमालीची व्यवस्था करावी, अशीही मागणी आहे. पण मालकवर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. माथाडी अधिनियमात अशी कोणतीही तरतूद नाही. कारखान्यांवर कोणतीही पावती न देता वारणी वसूल केली जाते.
हा सर्व खर्च ज्याचा त्याने करावा अशी वाहतूकदारांची भूमिका आहे. चर्चेत उदयशंकर चाकोते, अल्ताफ सवार, बाळासाहेब कलशेट्टी, शंकरराव चिंचकर, राजशेखऱ सावळे, महेश पाटील, जयंत सावंत, प्रदीप मगदूम आदींनी भाग घेतला.
चौकट
रेल्वेकडे वाहतूक सुरुच
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व साखऱ कारखान्यांतून साखरेची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. राज्यात तसेच देशात कुठेही साखर नेली जाणार नाही. कारखान्यातून रेल्वेकडे होणारी वाहतूक मात्र सुरुच राहील.