वांगीत रंगीबेरंगी कलिंगडाचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:51+5:302021-04-20T04:27:51+5:30
मोहन मोहिते लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील स्वप्निल जयवंतराव देशमुख यांनी थायलंडवरून येणारी रंगीबेरंगी ...

वांगीत रंगीबेरंगी कलिंगडाचा प्रयोग यशस्वी
मोहन मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी
: वांगी (ता. कडेगाव) येथील स्वप्निल जयवंतराव देशमुख यांनी थायलंडवरून येणारी रंगीबेरंगी कलिंगड पाहिली आणि स्वत:च्या शेतातही या पिकाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्यांनी आंतरपीक म्हणून ३५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेत ४ लाख ९० हजारांचे उत्पन्न घेतले. ही फळे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
वांगी येथील स्वप्निल देशमुख यांनी रंगीबेरंगी कलिंगडाचे उत्पादन घेण्याचा निश्चय केल्यावर पुणे, सांगलीत जाऊन हे वाण उपलब्ध केले. त्या बियाणांपासून रोपवाटिकेत रोपे तयार करून घेतली. त्यांनी हलक्या प्रतीच्या अडीच एकर क्षेत्रात साडेचार फुटाची सरी सोडत पट्टा पद्धतीने २ फेब्रुवारी रोजी ८६०३२ वाणांच्या ऊस रोपांची लागवड केली होती. त्या पट्टा सोडलेल्या सरीचे बेड तयार करून त्यावर मल्चिंग कागद टाकून अनमोल (आतून पिवळा), आरोही (आतून पिवळा) व विशाला (बाहेरुन पिवळा) या रंगीबेरंगी कलिंगड पिकाची लागवड केली.
पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. लागवडीनंतर पहिले दहा दिवस पाणी व औषधांची योग्य पद्धतीने आळवणी दिली. रोपे उत्तमरित्या बहरू लागल्यानंतर ‘ठिबक’मधून रासायनिक खतांची मात्रा दिली. पिकावर कीटकनाशक फवारणीही केली. केवळ ७० दिवसांत ऊस पिकात आंतरपीक घेतलेली रंगीबेरंगी कलिंगड तयार झाली.
त्यांची मागणी लक्षात घेऊन गोवा, मुंबई, हैद्राबाद, बेंगलोर शहरात विक्रीला पाठविली. एकरी १५ टनाचे उत्पादन, तर सरासरी प्रतिकिलोस १४ रुपये दर मिळाला. एकूण ३५ टनाचे उत्पादन घेत त्यांना ४ लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले. कृषी तज्ज्ञ विजय पोळ, धनाजी दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. ही रंगीबेरंगी कलिंगड फळे पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.
चौकट
शेतात नवनवीन प्रयोग करून बाजारात काय विकले जाते याचा अभ्यास करून उत्पादन घेतले पाहिजे. तरच शेती फायद्यात येईल.
- स्वप्निल देशमुख, प्रगतशील शेतकरी, वांगी