राष्ट्रवादीच्या बेरजेपुढे विरोधकांची वजाबाकी
By Admin | Updated: May 27, 2016 00:17 IST2016-05-26T22:15:56+5:302016-05-27T00:17:46+5:30
इस्लामपुरात नगरपालिका : आगामी निवडणुकीत मातब्बरांचीच रेलचेल; तयारी सुरू

राष्ट्रवादीच्या बेरजेपुढे विरोधकांची वजाबाकी
अशोक पाटील -- इस्लामपूर
आगामी पालिका निवडणुकीत प्रभाग रचनेचा बदल, आरक्षण यावरच निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्यांच्या घरातच उमेदवारी मिळविण्यासाठी रेलचेल असणार आहे. तसेच विरोधी गटात एक-दोन प्रभागातच मातब्बरांची तयारी सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बेरजेपुढे विरोधकांची वजाबाकी होत असल्याचे चित्र आहे.
गत निवडणुकीत ७ प्रभाग होते. ५ प्रभागात एकूण ४ उमेदवार, तर २ प्रभागात ३ उमेदवार होते. असे एकूण २६ आणि २ स्वीकृत असे २८ जण नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत मात्र जनतेतून नगराध्यक्ष निवडावयाचा आहे, तर १४ प्रभाग होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी २ उमेदवार असतील. त्यामुळे नगराध्यक्ष सोडून २८ नगरसेवक सभागृहात असतील. याव्यतिरिक्त स्वीकृतची संख्या वेगळी राहणार आहे.
प्रभाग १ मधून ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे हे विद्यमान नगरसेवक आहेत. या विद्यमान नगरसेवकांच्या घरातच उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. या प्रभागात मात्र विरोधी महाडिक गटाचे उदय पाटील वगळता सक्षम उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे.
प्रभाग २ मध्ये खंडेराव जाधव, अरुणादेवी पाटील, चंद्रकांत पाटील, शुभांगी शेळके हे विद्यमान नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यास अरुणादेवी पाटील या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असणार आहेत. खंडेराव जाधव हेही इच्छुक उमेदवार आहेत. डांगे गटाचे म्हणून चंद्रकांत पाटील यांनाही पुन्हा संधी मिळेल. एन. ए. गु्रपच्या शुभांगी शेळके यांनाच पुन्हा संधी मिळेल. या प्रभागात विरोधी गटातून प्रभावी नेतृत्व म्हणून वैभव पवार, दादा पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु उर्वरित २ सक्षम उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
प्रभाग ३ मध्ये विद्यमान नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार, सीमा इदाते, छाया देसाई हे विद्यमान नगरसेवक आहेत. यामध्ये विरोधी गटातून आनंदराव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, सनी खराडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
प्रभाग ४ मध्ये चिमण डांगे, पीरअली पुणेकर, कविता पाटील, सुवर्णा कोळी हे नगरसेवक आहेत. यातील सुवर्णा कोळी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे. त्यांच्याविरोधात एल. एन. शहा, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, सोमनाथ फल्ले यांची उमेदवारी असण्याची शक्यता आहे. प्रभाग ५ मध्ये संजय कोरे, मिनाज मुल्ला, आनंदराव मलगुंडे, वैशाली हांडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. हे चारही नगरसेवक आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच त्यांच्याविरोधात विक्रमभाऊ पाटील, महाडिक गटाचे चेतन शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. विरोधकांना दोन उमेदवारांची कमतरता भासणार आहे.
प्रभाग ६ मध्ये विरोधी पक्षनेते विजय कुंभार, महाडिक गटाचे कपिल ओसवाल, तर राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील हे तीन नगरसेवक आहेत. दोन नगरसेवकांचा एक प्रभाग झाल्याने येथे एक नगरसेवक वाढणार आहे. राष्ट्रवादी यावेळी उमेदवार निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर करतील. प्रभाग ७ मध्ये पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, शालन कोळेकर, कविता कांबळे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. याठिकाणी विरोधकांचे पारडे कमकुवत आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीमध्ये मातब्बर नगरसेवकांच्या घरातच रेलचेल राहणार आहे.
महिलांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्र
राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यमान महिला नगरसेवकांमध्ये काही ठराविकच महिला पालिकेच्या कारभारात सक्रिय आहेत. बहुतांशी महिला या नावापुरत्याच नगरसेविका आहेत. त्यांचे चेहरेही मतदारांना माहीत नाहीत. त्यामुळे अशा महिलांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्र मिळेल.
पकड राजकारणाची
विरोधी गटाला मार्गदर्शक व आपल्या भाषणबाजीतून प्रसिध्दीच्या झोतात आलेले सदाभाऊ खोत विधानपरिषदेवर आमदार होऊन मंत्रीही होतील. परंतु इस्लामपूर शहरातील राजकारणात आमदार जयंत पाटील यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागेल की नाही, हे येणारा काळच ठरवेल.