अपूर्ण कामांबाबत फौजदारी दाखल करा
By Admin | Updated: August 27, 2014 23:17 IST2014-08-27T23:02:19+5:302014-08-27T23:17:43+5:30
सीईओंचे आदेश : ‘भारत निर्माण’चा बट्ट्याबोळ

अपूर्ण कामांबाबत फौजदारी दाखल करा
मिरज : मिरज तालुक्यातील सात गावांत भारत निर्माण योजनेच्या अपूर्ण कामांबाबत अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पंचायत समिती छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता एकनाथ नागरगोजे यांनी दिली.
मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, नरवाड, बिसूर, संतोषवाडी व विजयनगर या सात गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भारत निर्माण योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मंजुरीनंतर वर्ष ते दीड वर्षात योजना पूर्ण करावयाच्या होत्या.
वारंवार मुदतवाढ देऊनही त्या आठ वर्षात अपूर्णच आहेत. टाकळी, बोलवाड व सुभाषनगर येथील योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली असली, तरी योजनेत समाविष्ट असलेल्या हुळ्ळे प्लॉटपर्यंतचे काम न झाल्याने हे काम अपूर्ण आहे. नरवाड येथे २ कोटी २० लाखांची योजना मंजूर आहे. या निधीतून केवळ जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. योजनेची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. बिसूर येथे मंजूर १७ लाख निधीपैकी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सात लाख रुपये खर्चाचा हिशेबच उपलब्ध नाही. संतोषवाडी येथील योजनेचा समावेश असलेल्या वस्त्यांचे काम अपूर्ण आहे. विजयनगर येथील भारत निर्माण योजनेवर खर्च करण्यात आलेल्या खर्चाच्या हिशेबाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. मुदतवाढ देऊनही भारत निर्माण योजनेचे काम वेळेत न करणे, दर्जाहीन कामे, निधीचा अपहार याची गांभीर्याने दखल घेऊन या योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले. (वार्ताहर)
आठवड्याभरात कारवाई होणार
भारत निर्माण योजनेतील अनियमितता व हिशेबातील गोंधळ याची दखल घेऊन भारत निर्माण योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी अभियंता नागरगोजे यांनी सांगितले.