नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी; उपनगराध्यक्षपदी संजय कोरे?
By Admin | Updated: July 12, 2014 00:21 IST2014-07-12T00:14:29+5:302014-07-12T00:21:01+5:30
इस्लामपूर पालिका : राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान

नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी; उपनगराध्यक्षपदी संजय कोरे?
अशोक पाटील - इस्लामपूर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी, तर उपनगराध्यक्षपदी संजय कोरे यांची निवड होण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. स्वीकृत नगरसेवकांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. येणाऱ्या अडीच वर्षासाठी हे पद इतर मागास पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. सुभाष सूर्यवंशी एकमेव दावेदार असल्याने त्यांनाच संधी मिळणार आहे, परंतु त्यांना हे पद मिळू नये म्हणून त्यांच्या विरोधी गटाने तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारी अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सूर्यवंशींना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.
उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण यांचीही मुदत संपल्याने या पदावर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील गटातून पीरअली पुणेकर, तर एन. ए. गु्रपमधून संजय कोरे यांची नावे पुढे आली आहेत. महिलेला संधी देण्याचा विचार झाल्यास लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे यांच्या नावासाठी विजयभाऊ पाटील आग्रही राहतील, असे सांगण्यात येते.
दि. २२ जुलैरोजी निवडी होण्याची शक्यता आहे. निवडीचा अंतिम निर्णय जयंत पाटील हेच घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर इस्लामपूर शहरातील राजकारणात पाटील यांनी थोडेसे दुर्लक्ष केले आहे. विधानसभा निवडणुकीला पालिकेतील फळी मजबूत करण्यासाठी सर्वच गटांना न्याय देण्याच्या भूमिकेतून या निवडी होणार आहेत. एन. ए. गु्रपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्यास पालिकेचा कारभार सुरळीत चालेल, असे सांगितले जाते. यामुळेच कोरे यांनाच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. स्वीकृत नगरसेवकांमध्येही बदल होणार आहेत. शहाजीबापू पाटील, अॅड. संपत पाटील, सदानंद पाटील यांच्या जागांवर युवकांना संधी द्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे.