जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय आघाडी

By Admin | Updated: March 28, 2015 00:01 IST2015-03-27T23:08:27+5:302015-03-28T00:01:36+5:30

निवडणूक : लवकरच निर्णय होणार

Sub-alliance of district bank | जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय आघाडी

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय आघाडी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह सर्वपक्षीय आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत सर्वपक्षीय आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच भाजपकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. गतवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत आघाडी केली होती. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व नगण्य होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला ग्रहण लागले असून विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारली होती. खा. संजय पाटील यांच्यासह शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे असे चार भाजपचे आमदार आहेत, तर अनिल बाबर शिवसेनेकडून निवडून आले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे पलूस, तासगाव व वाळवा या तीनच तालुक्यात वर्चस्व आहे. मिरज तालुक्यात माजी मंत्री मदन पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आघाडी करण्यावर प्राथमिक चर्चा केली. माजी आमदार विलासराव शिंदे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी अनुकूलता दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कुणाकडूनही प्रस्ताव नाही
याबाबत खासदार संजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. सर्वपक्षीय आघाडीबाबतची चर्चा कानावर आली आहे. पण अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादीकडून प्रत्यक्ष प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर त्याबाबत विचार करू.
विलासराव शिंदे व मोहनराव कदम म्हणाले की, सहकारात पक्षीय राजकारण असू नये, यासाठी दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय आघाडी असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्याबाबत लवकरच भाजप नेत्यांशी चर्चा केली जाईल. त्याला भाजपकडून प्रतिसाद मिळेल.

Web Title: Sub-alliance of district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.