सांगली : जिल्ह्यात माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी 'विद्यार्थांची दफ्तर तपासणी मोहीम' राबवली जाणार आहे. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची दररोज दप्तर तपासणी करावी असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिले आहेत. ते स्वत: महिन्यातून दोनवेळा अचानकपणे दफ्तर तपासणी करणार आहेत.शिक्षणाधिकारी लोंढे म्हणाले, 'विद्यार्थी व युवकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थांनी अंमली पदार्थ जवळ बाळगू नयेत, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी महिन्यातून दोनवेळा अचानकपणे दफ्तर तपासणी करावी असे आदेश दिले आहेत. तपासणी दरम्यान दफ्तरात अंमली पदार्थ आढळून आल्यास विद्यार्थ्याचे समुपदेशन केले जाणार आहे. मुलांच्या दप्तराची तपासणी पालक व शिक्षक करतील, तर मुलींच्या दफ्तराची तपासणी शिक्षिका करणार आहेत.दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांची दफ्तर तपासणी मोहीम शिक्षणाधिकारी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. सर्व शाळांना व पालकांना या मोहिमेच्या अनुषंगाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या दफ्तरातून अंमली पदार्थ, हत्यार आदीची ने- आण होऊ नये यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तपासणीमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांची देखरेखही राहणार आहे.दफ्तरात चाकू तंबाखू आणि सिगारेटयापूर्वी काहीवेळा विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चाकू, तंबाखू, सिगारेट अशा वस्तू शिक्षकांना आढळल्या आहेत. विद्यार्थ्याने वर्गात चाकुहल्ला केल्याच्या काही घटनाही राज्यभरात काही ठिकाणी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या दफ्तरतपासणीमुळे शिक्षक व पालकांचे त्यांच्यावर थेट लक्ष राहणार आहे.
विद्यार्थांची दफ्तर तपासणी मोहीम; सांगलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश, कारण.. जाणून घ्या
By संतोष भिसे | Updated: January 30, 2025 17:20 IST