एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:04+5:302021-07-14T04:31:04+5:30
फोटो - सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या ...

एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल
फोटो - सुरेंद्र दुपटे
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या सुरू केल्या खऱ्या पण अजूनही या गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. रातराणी बसेस रिकाम्याच धावत आहेत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स मात्र हाऊसफुल्ल आहेत.
लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला गेल्या तीन महिन्यात २५ कोटीपेक्षा अधिकचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यात मुंबई, पुणे, हैद्राबाद, शेगाव या मार्गांवर रातराणी बस सुरू केल्या. पण या बसेसला प्रतिसाद नाही. आठवड्यातील तीन दिवस प्रवासी असतात, तर उर्वरित दिवशी प्रवाशांची संख्या अगदीच कमी असते. त्यामुळे शेगाव मार्गावरील रातराणी बस बंद करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्स मात्र हैद्राबाद, बंगळुरू, मुंबई, लातूर, नांदेड, औरंगाबाद मार्गावर धावत आहेत. या ट्रॅव्हल्सला मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.
चौकट
एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी
१. मिरज - मुंबई
२. आटपाडी - हैद्राबाद
३. तासगाव - मुंबई
४. जत - मुंबई
५. सांगली - शेगाव (बंद)
चौकट
एसटीच्या रातराणी सेमी स्लीपर
१. एसटी महामंडळाकडून मुंबई, हैद्राबाद मार्गावर फेऱ्या सुरू आहेत. त्यातील रातराणी बसेस सेमी स्लीपर आहेत. बसमधील १५ सीट या स्लीपर, तर उर्वरित आसन आहेत.
२. जिल्ह्यात शिवनेरीच्या गाड्या नाहीत. पण शिवशाही आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने शिवशाही बंदच आहेत.
चौकट
एसटीबरोबरीने तिकीट
सध्या कोरोनामुळे एसटी व ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. एसटीच्या रातराणीला तसा प्रतिसाद कमी आहे. एसटी व ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरातही फारसा फरक नाही. मुंबईसाठी एसटीकडून ७०० रुपये तिकीट दर आहे, तर ट्रॅव्हल्सकडून गर्दी असेल तर ८०० आणि गर्दी कमी असेल तर ६०० रुपये दर आहे.
चौकट
स्वच्छ व आरामदायी प्रवास म्हणून
१. एसटीच्या बसपेक्षा नेहमीच ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. गाड्या स्वच्छ असतात. गर्दी नसेल तेव्हा एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी केलेले असतात. उलट एसटीचे दर नेहमीच स्थिर असतात. - राजू पटेल
२.एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असला तरी सुरक्षित प्रवासासाठी महामंडळच अधिक चांगले. मुंबई, पुण्यापर्यंतच्या प्रवाशांसाठी एसटीचाच वापर करतो. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तिकीट दरात दररोज बदल होतो. त्यापेक्षा एसटीचे दर स्थिर असतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही होत नाही. - संजय चव्हाण