देवराष्ट्रेत ३५ लाखाच्या तुटपुंज्या निधीवरच स्वतंत्र पाणी योजनेसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:19+5:302021-08-29T04:26:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवराष्ट्रे : दहा हजार लोकसंख्येसाठी एकाद्या पाणी योजनेचे काम हाती घेण्यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज असते; ...

देवराष्ट्रेत ३५ लाखाच्या तुटपुंज्या निधीवरच स्वतंत्र पाणी योजनेसाठी धडपड
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे
: दहा हजार लोकसंख्येसाठी एकाद्या पाणी योजनेचे काम हाती घेण्यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज असते; मात्र ३५ लाखांच्या तुटपुंज्या निधीवरच स्वतंत्र पाणी योजनेसाठी देवराष्ट्रेकरांची धडपड चालू आहे. यामुळे योजनेचे काम सुरू करून ते पूर्ण करण्याचे माेठे आव्हान लोकप्रतिनिधीसमोर आहे.
कुंडल प्रादेषिक पाणी योजना देवराष्ट्रेच्या ग्रामस्थांसाठी खर्चिक बनली आहे. या योजनेच्या नूतनीकरणासाठी आजवर १ कोटी ६३ लाखांचा खर्च झाला आहे. तरीही योजनेद्वारे वेळेत पाणी पुरवठा होत नाही. उलट अव्वाच्या सव्वा पाणीपट्टीमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. यासाठी गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीच्या स्वमालकीची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना निर्माण करण्याची गरज व्यक्त हाेत आहे. यासाठी लागणारा निधी व जिल्हा परिषदेची परवानगी मिळविणे गरजेचे आहे. पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून अंदाजे ३५ लाख रुपयाच्या निधीची तरतूद केली आहे. ही याेजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी जागा खरेदी, विहीर खुदाई, पाइपलाइन, पाण्याच्या टाकीची उभारणी, वीज कनेक्शन, मोटर यासह विविध कामांसाठी कोट्यवधीचा खर्च अपेक्षित आहे. तरीही केवळ ३५ लाखाच्या अल्प निधीवर पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी स्वतंत्र पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे; पण कमी पडणाऱ्या निधीची कोणतीही तरतूद केलेली दिसत नाही.
कुंडल पाणी योजनेतून गावास होणारा पाणी पुरवठा अनियमित आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीला अपेक्षित उपन्नही मिळत नाही. अन्यायकारक पाणीपट्टी कमी होऊन ग्रामपंचायतीचे उपन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे; पण योजना राबविताना गावची पुढील पंचवीस वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अंमलबजावणी हाेणे गरजेचे आहे.
फोटो : २८ देवराष्ट्रे २ : देवराष्टे ग्रामपंचायत इमारत