चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले
By Admin | Updated: October 26, 2014 00:03 IST2014-10-26T00:03:06+5:302014-10-26T00:03:06+5:30
रेल्वेतील घटना : जागेच्या बसण्यावरून बाचाबाची

चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले
मिरज : किर्लोस्करवाडी (ता. पलूस) रेल्वे स्थानकावर कोयना एक्स्प्रेसने मुंबई-कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशास चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून सोन्याची अंगठी, मणीमंगळसूत्र असा ६२,५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी प्रवीण भानुदास कदम (वय २८) व सुनील भानुदास कदम (३४, दोघे रा. बांबवडे, ता. पलूस) यांना आज (शनिवारी) सायंकाळी मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली.
सुभाष वसंतराव बिरांजे (रा. कोल्हापूर) पत्नी, मेहुणी व मुलासह शुक्रवारी कोयना एक्स्प्रेसने मुंबईहून कोल्हापूरकडे रेल्वेने येत होते. पुणे रेल्वे स्थानकावर संशयित प्रवीण कदम याच्याशी बसण्याच्या जागेवरून त्यांची बाचाबाची झाली. यावेळी प्रवीण कदम याने गावाकडे दूरध्वनी करून सुनील कदम व साथीदारांना किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. गाडी किर्लोस्करवाडीत आली असता सर्वांनी डब्यात घुसून सुभाष बिरांजे व त्यांच्या पत्नीस लाथा-बुक्क्याने मारहाण करून, चाकूचा धाक दाखवून अंगठी व मंगळसूत्र हिसकावून घेतले व डब्यामध्ये दहशत निर्माण केली.
मिरज रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी पलूस पोलिसांच्या मदतीने किर्लोस्करवाडी, पलूस, दुधोंडी या गावांत शोध घेऊन संशयितांना अटक केली. बांबवडेमधील इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सर्व संशयितांना २७ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)