हाॅलमार्कच्या नव्या कायद्याविरोधात सराफ पेठेत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:16+5:302021-08-24T04:30:16+5:30
सांगली : हाॅलमार्क युनिक आयडी प्रक्रियेच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदला सांगलीत मोठा प्रतिसाद मिळाला. येथील सराफ कट्टा ...

हाॅलमार्कच्या नव्या कायद्याविरोधात सराफ पेठेत कडकडीत बंद
सांगली : हाॅलमार्क युनिक आयडी प्रक्रियेच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदला सांगलीत मोठा प्रतिसाद मिळाला. येथील सराफ कट्टा परिसरातील सर्वच दुकाने सोमवारी बंद होती. नवा कायदा व्यवहार्य नसून तो त्रासदायक आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. या बंदमुळे बाजारपेठेतील दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
सांगली जिल्हा सराफ समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, सचिव पंढरीनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली सराफांनी बंद पुकारला होता. याबाबत माने म्हणाले की, हाॅलमार्कचे आम्ही स्वागतच करतो; पण युनिक आयडीचे नाही. ही एक विध्वसंक प्रक्रिया आहे. या नव्या कायद्यामुळे दागिन्यांची कोणत्याही सुरक्षा देत नाही. नोंदणी रद्द करणे, दंडात्मक कारवाई, जप्ती यातून सराफा उद्योगात इन्स्पेक्टर राज येण्याची भीती आहे. युनिक आयडीचा कायदा ग्राहकांच्या हिताविरोधात आहे. तसेच डेटा गोपनीयता व वैयक्तिक गोपनीयतेत हस्तक्षेप करतो. आधीच हाॅलमार्क यंत्रणेतून दागिने मिळण्यासाठी पाच ते दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यात नवीन युनिक आयडी कायद्याची भर पडली आहे. कायद्यात व्यापाऱ्यांवर कठोर तरतुदी लादल्या आहेत. त्यामुळे अनेक जण सफारी व्यवसायच बंद करतील. त्यातून लाखो कर्मचारी, कारागीर व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने हा नवा कायदा मागे घ्यावा, यासाठी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोमवारी दिवसभर सराफ पेठेतील सर्वच दुकान बंद ठेवण्यात आली होती. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात दहा कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली होती.