शहरांमध्ये कडकडीत, ग्रामीणला संमिश्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:55+5:302020-12-09T04:21:55+5:30

सांगली : केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या ''''भारत बंद''''ला सांगली जिल्ह्यातील शहरी ...

Strictly in the cities, composite closure to the rural | शहरांमध्ये कडकडीत, ग्रामीणला संमिश्र बंद

शहरांमध्ये कडकडीत, ग्रामीणला संमिश्र बंद

सांगली : केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी पुकारलेल्या ''''भारत बंद''''ला सांगली जिल्ह्यातील शहरी भागांत उत्स्फूर्त, तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रॅली, सभा घेऊन आंदोलकांनी केंद्र शासनाचा निषेध केला.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी आंदोलनाच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी व शहरी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठा, चौक, रस्ते दुपारपर्यंत ओस पडले होते. आंदोलनामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी बससेवा विस्कळीत झाली. सांगली शहरात काढण्यात आलेली आवाहन रॅली पोलिसांनी अडवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सांगलीत रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टी, आयटक, नागरिक जागृती मंच आदी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी संयुक्त आवाहन करीत रॅली काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडविले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत सुरू केलेले आत्मक्लेश आंदोलन सुरूच आहे. निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. दुसरीकडे युवक काँग्रेसने शहरातून मोटारसायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या पुतळा दहनाचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात सांगली, मिरज शहरांसह इस्लामपूर, जत, विटा, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस येथे उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी दुपारी तीननंतर बाजारपेठा खुल्या झाल्या.

चौकट

पोलिसांशी झटापट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेतला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.

Web Title: Strictly in the cities, composite closure to the rural