कोरोनास्थिती बिघडू नये यासाठी कठोर उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:41+5:302021-02-23T04:41:41+5:30
सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनास्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यात अद्याप तरी सर्व स्थिती नियंत्रणात असून संख्याही कमी होत ...

कोरोनास्थिती बिघडू नये यासाठी कठोर उपाययोजना
सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनास्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यात अद्याप तरी सर्व स्थिती नियंत्रणात असून संख्याही कमी होत आहे. तरीही कोरोनाविषयक खबरदारी न घेतल्यास गंभीर स्थिती पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आता केवळ दंड वसूल न करता त्यांंच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. नियंत्रणात असलेली कोरोनास्थिती बिघडू नये यासाठी प्रसंगी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.
कोरोना उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी असल्याने सध्या पूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. पण यामुळे बेफिकीरपणे वागणे बंद झाले पाहिजे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
प्रशासन नियम बनवत असले तरी त्याचे नागरिकांनी पालन करत आपली जबाबदारी दाखवून द्यावी. जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी झाल्याने अनेक जण बिनधास्त फिरत आहेत. असे केल्यास आता कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सभा, आंदोलने, मोर्चे, मेळावे आदींना पायबंद घालण्यात आला आहे. लग्न समारंभात उपस्थित राहण्यास पन्नास व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक जणांची उपस्थिती लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यजमानांसह मंगल कार्यालयाच्या मालकांवरही कारवाई होईल. दंडाचीही रक्कम आता २० हजारांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
चौकट
शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार
जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन हाेत असल्याने सर्व ठिकाणी शाळा सुरूच राहणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.