कोरोनाबाधितांवर उपचार न केल्यास कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:14+5:302021-05-30T04:22:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर बनल्यास त्याच्या उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या ...

कोरोनाबाधितांवर उपचार न केल्यास कडक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर बनल्यास त्याच्या उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या ऑक्सिजनसह बेडचीही उपलब्धता आहे. तरीही एखाद्या रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारास नकार दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, प्रशासनाने केलेल्या नियोजनाप्रमाणे गंभीर रुग्णांवर उपचारासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. तरीही काही रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही अशा तक्रारी आहेत. प्रशासनाने याची खातरजमा करून घ्यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
जिल्ह्यात दिवसाला सरासरी साडेसहा ते सात हजार जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून, तो सध्या १७.३५ टक्क्यांवर आला आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व भागात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नियोजन करावे. यासाठी आवश्यकता भासल्यास शासकीय इमारतीचा वापर करावा. याठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडचे नियोजन करावे.
फळे, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल; पण कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनीच सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
चौकट
तिसऱ्या लाटेची आतापासूनच तयारी करा
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यात लहान मुलांना अधिक बाधा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी व लहान मुलांवरील उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी दिले.