कामेरीत कोरोनाबाबत कठोर कारवाईचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:23+5:302021-06-10T04:19:23+5:30
कामेरी : येथील कोरोनाबाधितांची संख्या ४००च्यावर गेल्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाकडून गुरुवारपासून (दि. १०) रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना ...

कामेरीत कोरोनाबाबत कठोर कारवाईचा निर्णय
कामेरी : येथील कोरोनाबाधितांची संख्या ४००च्यावर गेल्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाकडून गुरुवारपासून (दि. १०) रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
अनिल जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दक्षता समितीची बैठक घेऊन वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांच्या आदेशानुसार गुरुवारपासून कामेरी गावावर पोलीस विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. विनामास्क आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर घरीच राहून उपचार घेणारे बाधित रुग्ण अथवा त्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांची तात्काळ संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी केली जाईल. तसेच किराणा, दूध, औषधे, कृषी सेवा केंद्र, बेकरी, भाजीपाला विक्रीवगळता सर्व व्यवसाय बंद राहतील. इतर दुकाने उघडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जाधव यांनी दिला.
आरोग्य विभागाने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकांचा जास्त संपर्क येणाऱ्या कामेरी, येडेनिपाणी व अन्य चार गावांतील सर्व व्यावसायिकांची गुरुवारपासून ॲंटिजन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जे व्यावसायिक ही चाचणी करणार नाहीत, त्यांना त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहेत. यावेळी सुनील पाटील, शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, संग्राम पाटील, तलाठी आर. बी. शिंदे, अशोक ठोंबरे, दिनेश जाधव, संजय पाटील उपस्थित होते.