वाळव्यात डिजिटल फलक फाडल्याने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:49+5:302021-03-31T04:27:49+5:30
वाळवा : येथील तासगाव रस्त्यावरील नेमिनाथनगरमध्ये आणि हाळभागात उभारण्यात आलेले डिजिटल फलक अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री फाडून, जाळण्याचा प्रयत्न ...

वाळव्यात डिजिटल फलक फाडल्याने तणाव
वाळवा : येथील तासगाव रस्त्यावरील नेमिनाथनगरमध्ये आणि हाळभागात उभारण्यात आलेले डिजिटल फलक अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री फाडून, जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात कमालीचा तणाव निर्माण झाला असून, ग्रामपंचायत सदस्याने आष्टा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
येथील नेमिनाथनगरमध्ये आणि हाळभागात राजकीय पक्षाचे दोन डिजिटल फलक लावण्यात आले होते. त्यावर स्थानिक नेत्यांसह राज्यपातळीवरील नेत्यांची छायाचित्रे होती. सोमवारी मध्यरात्री अज्ञाताने हे दोन्ही फलक फाडून टाकले, शिवाय ते जाळण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार राजकीय द्वेषातून झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद आणि पथकाने तातडीने भेट देऊन पाहणी केली. गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. हुतात्मा चौक, तासगाव रस्ता, इस्लामपूर व आष्टा रस्ता, खेड-बोरगाव रस्ता आणि गावातील अंतर्गत मुख्य रस्ते येथे पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.