मिरज कोविड प्रयोगशाळेवर पुन्हा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:33+5:302021-04-10T04:26:33+5:30
मिरज सिव्हिलमध्ये जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यांत येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू ...

मिरज कोविड प्रयोगशाळेवर पुन्हा ताण
मिरज सिव्हिलमध्ये जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यांत येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख नमुने तपासण्यात आले आहेत. गत जून महिन्यापासून जिल्ह्यातील रुग्णांची व संशयितांची संख्या वाढत गेल्याने दररोज हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुन्यांची संख्या वाढल्याने सिव्हिल प्रयोगशाळेत पॅथाॅलाॅजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या आरोग्य सहाय्यकांचीही मदत घेण्यात आली. प्रयोगशाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाला तोंड द्यावे लागले. डिसेंबरपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने प्रयोगशाळेवरील ताण कमी झाला. जानेवारीपर्यंत दररोज केवळ दोनशे नमुने तपासणीसाठी येत होते. मात्र मार्चअखेर रुग्णांची संख्या वाढत गेल्याने आता दररोज हजार नमुने तपासणीसाठी येत आहेत. दैनंदिन तपासणीची संख्या वाढली असतांनाच राज्यसेवा परीक्षेसाठी आरटीपीसीआर तपासणी आवश्यक असल्याने मिरज सिव्हिल प्रयोगशाळेत गेल्या दोन आठवड्यात विद्यार्थी व पर्यवेक्षकांच्या दररोज हजारो नमुन्यांची तपासणी करण्यांत आली. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल दोन हजार नमुने तपासणीसाठी आल्याने प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. प्रयोगशाळेतील १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीला रुग्णालयाच्या अन्य विभागातील तंत्रज्ञ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे. प्रयोगशाळेत २४ तास काम सुरू असून येथे तपासणीसाठी रियल टाइम पीसीआर ही दोनच उपकरणे असल्याने तपासणीची गती संथ आहे. स्वयंचलित रसायनांचे मिश्रण करणारे उपकरण नसल्याने जादा कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. जिल्ह्यातील नमुन्यांची संख्या वाढत असल्याने अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातही कोविड प्रयोगशाळा सुरू झाल्यास मिरज कोविड प्रयोगशाळेवरील ताण कमी होऊन रुग्णांचा तपासणी अहवाल जलद मिळणार आहे.
चाैकट
मिरज कोविड प्रयोगशाळेची तपासणी क्षमता वाढविण्यासाठी एक पीसीआर यंत्र व जम्बो एक्स्ट्रॅक्टर मिळाला आहे. आठवड्याभरात ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नमुने तपासणीची सध्याची क्षमता दुप्पट होणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.