भांडणापेक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ताकद लावावी
By Admin | Updated: May 21, 2015 00:03 IST2015-05-20T23:01:00+5:302015-05-21T00:03:00+5:30
निवृत्ती शिंदे : जत तालुक्यातील भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना टोला

भांडणापेक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ताकद लावावी
उमदी : जत तालुक्यातील कॉँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला वादविवाद थांबवून दोन्ही नेत्यांनी टीकेसाठी ताकद न लावता, म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ती लावली, तर पुण्य लागेल. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी संघर्ष समितीतर्फे आयोजित उमदी-सांगली पदयात्रेला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा देऊन सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते निवृत्ती शिंदे (सरकार) यांनी व्यक्त केले.तालुका पाणी संघर्ष समितीच्या उमदी-सांगली पदयात्रेसंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, अनिल शिंदे, महम्मद कलाल, कांतप्पा शिंदे, मानसिध्द पुजारी, मलाय्या मठपती, दशरथ चव्हाण उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कायमस्वरूपी पाण्यासाठी आमदार विलासराव जगताप, कॉँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, पी. एम. पाटील, माजी आ. सनमडीकर, मा. आ. प्रकाश शेंडगे, जनस्वराज पक्षाचे नेते बसवराज पाटील या नेत्यांनी मोर्चा काढून जनआंदोलनकेले आहे. अनेक निवडणुकीत एकमेकाविरूध्द अनेकदा टीका झाली आहे. मात्र जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर एकमेकांविरुध्द अत्यंत खालच्या दर्जाची टीका करणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या तालुका भीषण पाणी टंचाईला सामोरा जात आहे. पिण्याच्या पाण्याची व चाराटंचाई भासत आहे. अशा स्थितीत टीका थांबवून विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे.
तालुका पाणी संघर्ष समितीने २३ जानेवारी २०१४ रोजी प्राणांतिक उपोषण केले. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता. उपोषणावेळी शासनाने दीड वर्षात पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. २३ जून २०१५ रोजी दीड वर्षे पूर्ण होत आहे. मात्र शासनाची ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे संघर्ष समितीने १७ जूनपासून ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी उमदी-सांगली पदयात्रा आयोजित केली आहे, असे शिंदे म्हणाले. (वार्ताहर)