आत्मनिर्भर यात्रेला महाडिक गटाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:41+5:302020-12-26T04:21:41+5:30

इस्लामपूूर : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात, जयंत पाटील यांच्या मतदारसंघात आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी ...

The strength of the Mahadik group to the self-reliant yatra | आत्मनिर्भर यात्रेला महाडिक गटाचे बळ

आत्मनिर्भर यात्रेला महाडिक गटाचे बळ

इस्लामपूूर : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात, जयंत पाटील यांच्या मतदारसंघात आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी महाडिक गटाचेच कार्यकर्ते अधिक होते. इस्लामपूर येथे रविवारी यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. याचे नियोजनही महाडिक गटानेच केले आहे.

वाळवा-शिराळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपचे नाव घेतले जाते. परंतु भाजपमध्ये माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, महाडिक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील असे गट आहेत. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी या यात्रेचे नेतृत्व केले आहे. परंतु यात्रेच्या प्रारंभाचे संयोजन भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी केले.

यावेळी राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाचेच कार्यकर्ते अधिक होते. सांगतेचे नियोजनही राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली होत असून या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. महाडिक गटाचे माजी नगरसेवक सतीश महाडिक, कपिल ओसवाल, अमोल पडळकर, नगरसेवक अमित ओसवाल, महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, मन्सूर वाठारकर, प्रवीण चिकुर्डेकर, आर. एम. बागडे, सचिन पाटील, दीपक पडळकर आदींनी संयोजन केले आहे. त्यात भाजपमधील इतर गटांना स्थान दिल्याचे दिसत नाही. किसान आत्मनिर्भर यात्रेच्या पाठीशी महाडिक गटाची ताकद असल्याचे जाणवते.

फोटो - देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राहुल महाडिक.

Web Title: The strength of the Mahadik group to the self-reliant yatra