सुसंस्कारित माणूस घडविण्याची साहित्यात ताकद

By Admin | Updated: January 17, 2016 00:36 IST2016-01-17T00:15:35+5:302016-01-17T00:36:38+5:30

विठ्ठल वाघ : सांगलीवाडीतील एकदिवसीय ज्ञानभारती साहित्य संमेलन उत्साहात

Strength in the literature of creating a well-manned man | सुसंस्कारित माणूस घडविण्याची साहित्यात ताकद

सुसंस्कारित माणूस घडविण्याची साहित्यात ताकद

सांगली : शाळांमध्ये समृध्द ग्रंथालये असताना, त्याचा किती विद्यार्थी वापर करतात, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ शिक्षणासाठी पुस्तके न वाचता विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिध्द करण्यासाठी पुस्तके वाचावीत. मात्र, वाचन कमी झाल्याने संस्कारहीन पिढी निर्माण होण्याचा धोका वाढला असून, मनाला संस्कारित करण्याची आणि माणसाला घडविण्याची ताकद साहित्यात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखकविठ्ठल वाघ यांनी शनिवारी केले.
सांगलीवाडीतील पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन वाघ बोलत होते. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम संमेलनाच्या स्वागताध्यक्षा होत्या.
वाघ म्हणाले की, डोळ्यासमोर टीव्ही आणि हातात मोबाईल असलेल्या पिढीचे वाचन कमी होत चालले आहे. कुटुंबातील व्यक्तींना दैनंदिन कामाच्या व्यापातून मुलांवर संस्कार करण्याची वेळच नसल्याने हे संस्कार करण्याचे काम पुस्तके प्रभावीपणे करू शकतात. आज महागाईतच गुरफटून गेलेल्या पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. या दूषित वातावरणात आता शिक्षकांनी भान ठेवून या मुलांच्या आई, वडील, भाऊ आणि मित्राची भूमिका पार पाडत संस्कार करणे गरजेचे आहे. लिहिणाऱ्यांनी कल्पनेतून लिखाण न करता परिसरातील घटनांचे प्रतिबिंब कसे उमटेल, हे पहावे.
ते म्हणाले की, शून्यातून सृष्टी निर्माण करण्याची ताकद श्रमात असते. तरुणांनी स्वप्न पाहणे चांगलेच, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची आवश्यकता असून, त्या श्रमाला घामाचा वास आला पाहिजे.
विजयमाला कदम म्हणाल्या की, केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांचेही वाचन कमी होत आहे. वाचन वाढविल्याशिवाय सखोल माहिती देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही ग्रंथालयाचा वापर वाढवावा.
संमेलनात दुपारच्या सत्रात ‘साहित्य, समाज आणि शिक्षण’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. ‘माझे लेखनानुभव’ या विषयावर डॉ. मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. यानंतर कथाकथन, कविसंमेलनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी भारती विद्यापीठाचे मानद संचालक एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, संतोष काळे, प्रभा पाटील, सूर्यकांत बुरुंग, संतोष माने उपस्थित होते. प्राचार्य डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. बी. डी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
वाघाची बकरी झाली!
शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारताना प्रशासकाची दमछाक होत असते. त्यामुळे भारती विद्यापीठाने गुणवत्ता टिकविताना केलेल्या प्रयत्नांना दाद दिलीच पाहिजे. कारण शैक्षणिक बदल आणि त्यांची अंमलबजावणी करतानाचा मला प्राचार्य म्हणून अनुभव असून, हे बदल करताना या वाघाचीही बकरी झाली होती, असे वाघ यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
शिकार होऊ देऊ नका!
आजच्या तरुण पिढीपुढे वेगवेगळ्या माध्यमातून आमिषांचे जाळे निर्माण होत असून, त्यापासून तरुणांनी विशेषत: मुलींनी दूर राहणे गरजेचे आहे. आमिषे दूर ठेवल्याने आई-वडिलांनाही आधार मिळतो. मुलींनो, कोणाकडून आपली शिकार होऊ देऊ नका, असे आवाहनही वाघ यांनी केले.

Web Title: Strength in the literature of creating a well-manned man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.