गुंठेवारीचे रस्ते चिखलात, शहरातील बोळ मात्र काँक्रिटचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:11+5:302021-06-11T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पावसामुळे एकीकडे गुंठेवारी भागातील नागरिकांना चिखलातून रस्ता शोधावा लागत असताना, शहरातील एका छोट्या बोळात ...

गुंठेवारीचे रस्ते चिखलात, शहरातील बोळ मात्र काँक्रिटचे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पावसामुळे एकीकडे गुंठेवारी भागातील नागरिकांना चिखलातून रस्ता शोधावा लागत असताना, शहरातील एका छोट्या बोळात मात्र दहा लाख रुपये खर्चून काँक्रिटचा रस्ता करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बोळात एका बड्या ठेकेदाराचे घर आहे. त्याव्यतिरिक्त या रस्त्यावर कुणाचीच वर्दळ नाही. गुंठेवारीत निधी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, पण ठेकेदारासाठी मात्र पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी केला आहे.
पटेल म्हणाले की, शहरातील गुंठेवारीत पावसामुळे दैना उडाली आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. रस्ते चिखलमय बनले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी मुरूमाचा पत्ता नाही. चिखलातूनच नागरिक, महिलांना ये-जा करावी लागत आहे. नागरिकांनी सुविधांची मागणी केली की, निधी नसल्याचे कारण दिले जाते. ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र अनावश्यक कामावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
शहरातील एका छोट्या बोळाचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावर दहा लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च केली. या बोळात केवळ एका ठेकेदाराचे घर आहे. इतर कोणीही या रस्त्याचा वापर करीत नाही. केवळ ठेकेदारासाठी हा रस्ता केला की काय? अशी शंका येते. गुंठेवारीतील नागरिक नरकयातना सहन करीत असताना, त्यांना कोणीच वाली उरलेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.