वादळी पावसामुळे सांगलीकरांचे हाल बेहाल

By Admin | Updated: June 11, 2016 01:27 IST2016-06-11T01:26:58+5:302016-06-11T01:27:19+5:30

३५ झाडे पडली : विद्युत व पाणीपुरवठा खंडित, उपनगरे चिखलात; घरांच्या भिंतीही कोसळल्या

Stormy rain due to the Sangli car | वादळी पावसामुळे सांगलीकरांचे हाल बेहाल

वादळी पावसामुळे सांगलीकरांचे हाल बेहाल

सांगली : शहरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३५ झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्याचा परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर झाला असून दिवसभर पाणीपुरवठा खंडित होता. पावसामुळे शामरावनगर, विनायकनगरसह उपनगरे चिखलात रुतली आहेत. झाडे पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडून गेले असून भिंतीही कोसळल्या आहेत. शेरीनाल्याचे पाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळत होते. या पावसाने शहराचे हाल बेहाल झाले आहे.
गुरुवारी रात्री शहर आणि परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील ३५ झाडे उन्मळून पडली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या होत्या. खणभाग, स्टेशन चौक, वखार भाग, आपटा पोलिस चौकी परिसरात झाडे पडली होती. महापालिकेच्या अग्निशमन व उद्यान विभागाकडून दिवसभर पडलेली झाडे तोडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. रात्रीपासूनच महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. बहुतांश झाडे विजेच्या खांबांवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा गुरुवारी रात्रीपासून खंडित झाला होता. सायंकाळपर्यंत अनेक भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. अनेक ठिकाणी विद्युत खांबच मोडले होते.
महापालिकेच्या कृष्णा नदीवरील जॅकवेलजवळील पाच विद्युत खांब मोडून पडले होते. त्यामुळे शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. स्टेशन चौकातील झाडे तोडून दुपारी तेथून जॅकवेलपर्यंत विजेचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी महापालिकेने पाणी उपसा सुरू केला आहे. शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. पावसामुळे उपनगरे चिखलमय झाली आहेत. शामरावनगर, विनायकनगर, महसूल कॉलनी परिसरात ड्रेनेजचे काम सुरू आहे. ठेकेदाराने माती रस्त्यावर टाकल्याने हा संपूर्ण परिसर चिखलात रुतला होता. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त खेबूडकर, शहर अभियंता आर. पी. जाधव, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सकाळी पाहणी केली. शामरावनगर ते झुलेलाल मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकण्याचे आदेश दिले आहेत. मिरज शहराच्या काही भागालाही वादळी पावसाचा फटका बसला. (प्रतिनिधी)

रात्रभर : अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर

रात्री पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापालिका व विद्युत विभागाचे कर्मचारी रात्रभर रस्त्यावर उतरले होते. उन्मळून पडलेली झाडे तोडून सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, तर काही ठिकाणी विद्युत खांब मोडले होते. त्यावरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक् प्रयत्न सुरू होते.

महापालिकेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी पहाटेपर्यंत काम करीत होते. सकाळी नऊ वाजता आयुक्त खेबूडकर कार्यालयात आले. त्यांनी आढावा घेऊन अत्यावश्यक ठिकाणी वेगाने काम करण्याची सूचना केली. नगरसेवक प्रशांत मजलेकर यांनी तर खासगी कर्मचारी लावून झाडे तोडून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Stormy rain due to the Sangli car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.