जिल्ह्यास वादळी पावसाचा जोरदार तडाखा
By Admin | Updated: September 11, 2015 23:41 IST2015-09-11T23:08:31+5:302015-09-11T23:41:34+5:30
वाळवा तालुक्यात नुकसान : ज्वारी जमीनदोस्त; घरे, शेडवरील पत्रे, कौले उडाली; लाखोंचे नुकसान

जिल्ह्यास वादळी पावसाचा जोरदार तडाखा
ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुदु्रक, ढगेवाडी, शेखरवाडी परिसरास शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व जोरदार पावसाने झोडपून काढले. परिसरातील ८0 टक्के ऊस व ज्वारी पीक जमीनदोस्त झाले. घरे व शेडवरील पत्रे, कौले उडाली. तसेच विजेचे खांब कोलमडले व झाडे उन्मळून पडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारे व जोरदार पावसाने हाहाकार उडवून दिला. कार्वे येथील एकनाथ निवृत्ती पाटील यांच्या शेडवरील पत्रा ब्रॅकेटसह उडून शेजारच्या वीज ट्रान्स्फॉर्मरवर जाऊन पडला. यामुळे वीजतारा तुटून गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ऐतवडे बुद्रुक येथे शशिकांत कांबळे, हरीश कांबळे, सुषमा कांबळे यांच्या घरांवरील पत्रे, कौले उडून गेली. गौतमनगरात विद्युत खांब पडून तेथील वीज प्रवाह खंडित झाला होता. ऐतवडे बुद्रुक ते करंजवडे रस्त्यावर तीन ठिकाणी बाभळीची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिराळा—आष्टा या मुख्य रस्त्यावरील सुतार ओढा पाण्याखाली गेला होता. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आष्टा : आष्टा परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस हुलकावणी देत होता.गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी आष्टा, तुंग, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, नागाव, पोखर्णी, बागणी परिसरात दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचले होते. सोयाबीन, उसासह, झेंडूच्या बागेतही पाणी साचले होते. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आष्टा शहरातील शुक्रवारच्या आठवडा बाजारात पाऊस झाल्याने भाजी मंडईच्या बाहेर विक्री करण्यास बसलेले व्यापारी, विक्रेते व नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. अहिल्या चौक ते दरोजबुवा चौक या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बागणी : बागणी, काकाचीवाडी परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन व भुईमूग काढणाऱ्या शेतक ऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन व भुईमूग पिकाला चांगलाच फायदा होणार आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात सरासरी २३० मि.मी. पाऊस
सांगली : जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात एकूण २११.९ मि.मी., तर सरासरी २१.२ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. खानापूर-विटा तालुक्यात सर्वाधिक ३५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात २९.२ मि.मी., जत १६.९ मि.मी., वाळवा-इस्लामपूर १४.२ मि.मी., तासगाव २४.६ मि.मी., शिराळा २२.६ मि.मी., आटपाडी ३.७ मि.मी., कवठेमहांकाळ २४.३ मि.मी., पलूस २४.६ मि.मी. व कडेगाव तालुक्यात १६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३०९.१ मि.मी., तर सरासरी एकूण २३०.९ मि.मी. पाऊस पडला आहे.