‘एफआरपी’प्रमाणे दरासाठी रास्ता रोको

By Admin | Updated: December 29, 2014 23:37 IST2014-12-29T22:38:44+5:302014-12-29T23:37:05+5:30

शेतकरी आक्रमक : कार्वे-मंगरूळ फाट्यावर आंदोलन

Stop the way for rate according to 'FRP' | ‘एफआरपी’प्रमाणे दरासाठी रास्ता रोको

‘एफआरपी’प्रमाणे दरासाठी रास्ता रोको

पारे : चालू गळीत हंगामात एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या साखरसम्राटांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, गेल्या गळीत हंगामातील वसंतदादा साखर कारखान्याकडील थकित उसाची बिले तातडीने मिळावीत, चालू गळीत हंगामात एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आज, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खानापूर तालुक्यातील कार्वे-मंगरूळ येथील फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी विटा-तासगाव रस्ता सुमारे तासभर रोखून धरला. रस्त्यावर टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली.
चालू गळीत हंगामात सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जाहीर केलेला १९०० रूपये प्रतिटन दर हा एफआरपीपेक्षा कमी आहे. त्यामुळे कमी दर देणाऱ्या साखर कारखान्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी आज, सोमवारी सकाळी ११ वा. कार्वे गावानजीक मंगरूळ फाट्यावर सरपंच बाळासाहेब जाधव, पतंगराव जाधव, विठ्ठल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी हिंमतराव जाधव, बाळासाहेब जाधव, विठ्ठल जाधव, पतंगराव जाधव, उमेश मोहिते, प्रदीप जाधव, प्रवीण जाधव, राजू जाधव, नितीन भोसले यांच्यासह चिंचणी, कार्वे, मंगरूळ, बामणी येथील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी उपस्थित होते. चालू गळीत हंगामात एफआरपीप्रमाणे उसाला दर न मिळाल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला. (वार्ताहर)

वाहतूक तासभर ठप्प
आंदोलनकर्त्यांनी विटा ते तासगाव रस्त्यावर टायर पेटवून टाकल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, पोलीस निरीक्षक अनिल पोवार, बाजीराव पाटील यांच्यासह पोलीस कुमक आंदोलनस्थळी दाखल झाली. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार महाजन व पोलीस निरीक्षक पोवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवासी नायब तहसीलदार महाजन यांनी, मागण्या वरिष्ठांकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Stop the way for rate according to 'FRP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.