शासकीय नोकरभरती थांबविण्याचे प्रकार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:13+5:302021-02-08T04:23:13+5:30
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र त्यांचा प्रश्न निकाली लागेपर्यंत शासनाने शासकीय भरतीच थांबविणे योग्य नाही. ...

शासकीय नोकरभरती थांबविण्याचे प्रकार थांबवा
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र त्यांचा प्रश्न निकाली लागेपर्यंत शासनाने शासकीय भरतीच थांबविणे योग्य नाही. हा सर्व समाजघटकांतील तरुणांवर अन्याय करणारा प्रकार आहे. त्यामुळे तातडीने भरती सुरू करावी, अशी मागणी ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, आरक्षणाच्या खेळखंडोब्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला आहे. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला ५२ टक्के आरक्षणाचा विषय होता. त्याला आम्ही पाठिंबा दिला. अजूनही तसा आमचा पाठिंबा आहे, पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध राहील. समाजासमाजांत विनाकारण यामुळे वाद निर्माण करण्याचा उद्देश दिसून येतो. त्यामुळे शासनाने असे प्रकार थांबवावेत.
मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य जाती, जमातींचा जेवढा कोटा आहे, त्याप्रमाणात सर्व ठिकाणची शासकीय भरती सुरू करावी. शासकीय भरती थांबविल्यामुळे अन्य समाजांतील मुलांचे मोठे नुकसान हाेणार आहे. अनेकांची वयोमर्यादा यामुळे संपुष्टात येऊन ते कायमस्वरूपी या लाभापासून वंचित राहतील. गुणवत्ता असूनही त्यांना त्यांचे ध्येय गाठता येणार नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेला कोणीही खो घालू नये. आम्ही यासाठी शासनावर दबाव आणू. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत.
ओबीसीचा मेळावा घेऊन आमचीही ताकद सरकारला दाखवून देणार आहोत. हा संघर्षाचा विषय नसून अधिकाराचा विषय आहे. त्यामुळे शासनाने
ओबीसी समाजघटकांवर अन्याय होईल, असे निर्णय घेऊ नये. तसे झाल्यास आम्ही शासनाविरोधात संघर्ष करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.