वाघवाडी फाट्यावर रास्ता रोको
By Admin | Updated: February 9, 2015 23:55 IST2015-02-09T23:33:18+5:302015-02-09T23:55:23+5:30
केंद्र-राज्य शासनाचा निषेध : नागरी प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर

वाघवाडी फाट्यावर रास्ता रोको
इस्लामपूर : केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारांनी जनतेला खोटी आश्वासने देत फसवले आहे. यापुढील काळात सामान्य शेतकरी व जनतेचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज (सोमवारी) दिला. याचवेळी त्यांनी ऊस दराबाबत केंद्राने अनुदान द्यावे, अशी मागणी केली.येथील वाघवाडी फाट्यावर पुणे—बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर १८ मिनिटांचे रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी डॉ. कदम बोलत होते. पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रुपनवर, नंदिनी चंदेले, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. केंद्र व राज्यातील भाजप्रणित सरकारच्या शेतकरी व सामान्य जनताविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाभरातील एक हजारहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शासनकर्त्यांनी निवडणूक काळात अवास्तव व खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. एल.बी.टी., टोल हटला नाही. बँक खाती उघडा, त्यावर १५ लाख जमा होतील, ही घोषणा खोटी ठरली. पेट्रोल—डिझेलच्या किमती कमी नाहीत, महागाई वाढतच आहे, असा हल्लाबोल डॉ. कदम यांनी केला.
डॉ. कदम म्हणाले, पक्षाचे जनमत परत मिळविण्याचा निर्णय झाला आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आपण अवकाळी, गारपीट, दुष्काळग्रस्तांना साडेबारा हजार कोटींची मदत केली होती. मराठवाड्यातील शिल्लक उसाला एकरी २५ हजारांची मदत दिली होती. मात्र या शासनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या व जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
सत्यजित देशमुख म्हणाले की, वाकुर्डे योजनेचे पाणी ‘त्या’ ४८ गावांना सायफन पध्दतीने द्या, पेठ—वाघवाडी परिसरातील एम. आय. डी. सी. रद्द करा आणि वाघवाडी फाट्यावर उड्डाण पुलाची उभारणी करा. यावेळी शैलजा पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, सतीश पाटील, इंद्रजित साळुंखे, मालन मोहिते यांची भाषणे झाली.
तहसीलदार रुपाली सरनोबत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सांगली शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सी. बी. पाटील, महेंद्र लाड, हणमंतराव पाटील, जितेंद्र पाटील, भीमराव मोहिते, आनंदराव मोहिते, माजी आमदार हाफिज धत्तुरे, विजय पवार, महादेव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)