धनगर समाजाकडून जिल्ह्यात रास्ता रोको
By Admin | Updated: August 15, 2014 00:25 IST2014-08-14T22:49:27+5:302014-08-15T00:25:13+5:30
अनुसूचित जमातीचे आरक्षण : विटा, कवठेमहांकाळमध्ये मोर्चा, पलूस, करगणी, बुधगाव येथेही आंदोलन

धनगर समाजाकडून जिल्ह्यात रास्ता रोको
सांगली/कवठेमहांकाळ/विटा : अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने आज (गुरुवार) कोल्हापूर रस्त्यावरील अंकली फाटा व टिळक चौकात तासभर रास्ता रोको करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. विट्यात शेळ्या-मेंढ्या, ढोल-ताशे, पारंपरिक गजीनृत्य आणि घोषणाबाजी करीत खानापूर व कडेगाव तालुक्यातील हजारो धनगर समाजबांधवांनी विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले. प्रमुख मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली.
गुरुवारी खानापूर व कडेगाव तालुक्यातील धनगर समाजबांधव सकाळी ११ वाजता विट्यातील बिरोबा मंदिराजवळ एकत्रित आले. तेथून मोर्चास प्रारंभ झाला. आंदोलनकर्त्यांनी भर चौकातच रस्त्यावर ठिय्या मारल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.
आमदार सदाशिवराव पाटील, माजी आ. अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, शिवाजी शिंदे, जि. प. सभापती किसन जानकर, फिरोज शेख, भक्तराज ठिगळे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, भिवघाट येथेही धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विट्याचे नगरसेवक विशाल पाटील यांनी आ. सदाशिवराव पाटील यांच्यावतीने निवेदन स्वीकारले.
सांगली जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सांगली ते कोल्हापूर रसत्यावरील अंकली फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्यावरच ठिय्या मारला. ढोलवादन करुन शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको केल्यामुळे सुमारे चार कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनामध्ये नगरसेवक विष्णू माने, बाळासाहेब फोंडे, अभिजित तुराई, अमर पडळकर, प्रकाश ढंग, नानासाहेब लवटे, राजाराम शेंडगे, जयवंत कुंडले, धनंजय रुपनर, डॉ. दिलीप मगदूम, पांडुरंग अलदर, उद्योगपती पांडुरंग रुपनर, सरदार शेळके आदी होते.
कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा व चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जयसिंगराव शेंडगे म्हणाले, सत्ताधारी पक्षाकडून धनगर समाजावर आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी दबाव आणला जातोय. कार्यकर्त्यांना फोन करून धमकावले जाते, असा आरोप करण्यात आला. या आंदोलनावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, कवठेमहांकाळ काँग्रेसचे आप्पासाहेब शिंदे, लिंगायत समाज यांनी पाठिंबा दिला. यावेळी महेश खराडे, विजयराव शेजाळ, संजय लवटे, सुरेश घागरे, सूर्यकांत ओलेकर यांची भाषणे झाली.
जत येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जत शहरातील प्रताप चौक, शिवाजी चौक आणि तालुक्यातील व्हसपेठ, डफळापूर, मुचंडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अशोक बन्नेनवार, अॅड. एम. के. पुजारी, दादासाहेब तांबे, अजित पाटील, अनिल मदने, मुकुंद बंडगर, भूषण माने, टिमू एडके, रामचंद्र मदने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
ढालगाव, देवराष्ट्रेत बंद
--बुधगाव : बुधगावातही रास्ता रोको करण्यात आला. बसपचे नाना बंडगर, अमोल वाघमोडे, अरुण बंडगर, आनंदा बंडगर आदी सहभागी झाले होते.
--ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे आज (गुरुवार) उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार बंद होते.
--देवराष्ट्रे : देवराष्ट्रे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. मागण्यांचे निवेदन चिंचणी-वांगीचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, तलाठी बी. एम. पाटील यांनी स्वीकारले. माजी सभापती शोभा होनमाने, शांताराम होनमाने, प्रमोद गावडे, आनंदा होनमाने, शिवाजी होनमाने, आत्माराम ठोंबरे, दिलीप होनमाने, हौसेराव मंगसुळे सहभागी होते.
--आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे आटपाडी-भिवघाट रस्त्यावर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास वाहतूक खोळंबली. आंदोलनात भगवान सरगर, बिरूदेव सरगर, अशोक सावकार, प्रमोद धायगुडे, उत्तम माने, दत्तात्रय हाके आदी आंदोलनात सहभागी होते.