आमराईतील गार्डन ट्रेनचा प्रस्ताव रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:11+5:302021-02-05T07:30:11+5:30
सांगली : आमराई उद्यानात मिनी ट्रेन बसविण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या उद्यानात १६०० विविध प्रकारच्या वनस्पती व ...

आमराईतील गार्डन ट्रेनचा प्रस्ताव रोखा
सांगली : आमराई उद्यानात मिनी ट्रेन बसविण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या उद्यानात १६०० विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्षसंपदेचा ठेवा आहे. त्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे उद्यानातील गार्डन ट्रेनचा प्रस्ताव तातडीने रोखावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शेखर माने म्हणाले की, आमराईत मिनी ट्रेनचा प्रस्ताव म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी राज्य शासन व तत्कालीन नगरपालिका यांच्यात हस्तांतरणावेळी झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. आमराईचा वापर बागेशिवाय अन्य कोणत्याही कारणास्तव करता येणार नाही. नगरपरिषद कौन्सिलला आमराईत कोणतेही स्ट्रक्चर किंवा फेरबदल जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, अशी अट घातली होती. आमराईत गार्डन ट्रेन झाल्यास शांततेला बाधा येणार आहे. काळीखणलगत गार्डन ट्रेनचा महापालिकेने प्रस्ताव करावा, असे आदेश द्यावेत. सध्या आमराईत मेळावा, जाहीर प्रदर्शन, सिने शूटिंग, व्हिडीओग्राफीसाठी भाड्याने देण्यात येत आहे. त्यामुळे उद्यानाच्या मूळ हेतूलाच बाधा येत आहे. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केल्याचे माने यांनी सांगितले.
यावेळी डॉ. रवींद्र व्होरा, अजित ऊर्फ पापा पाटील, डॉ. मनोज पाटील, मकरंद देशपांडे, शेखर माने, सतीश साखळकर, किशोर पटवर्धन, प्रसन्न कुलकर्णी, डॉ. सुहास खांबे, डॉ. जे. बी. चौगुले, प्रा. नितीन कांबळे, विकास हणबर, विकास पाटील, अजित पाटील, दिनेश कुडचे, अजित काशीद उपस्थित होते.
फोटो ओळी :
शहरातील आमराई उद्यानातील गार्डन ट्रेनबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजित पाटील, शेखर माने, रवींद्र व्होरा, मनोज पाटील, जे. बी. चौगुले उपस्थित होते.