वीज तोडणी थांबवा, अन्यथा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:00+5:302021-09-02T04:58:00+5:30
सांगली : पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती दिल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, हा आदेश ...

वीज तोडणी थांबवा, अन्यथा उद्रेक
सांगली : पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती दिल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, हा आदेश धुडकावून महावितरणकडून वीज खंडित केली जात आहे. अधिकाऱ्यांनी वीज तोडणी थांबवावी, अन्यथा ग्राहकांचा उद्रेक होईल, असा इशारा भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
थकीत बिलासाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी खा. पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी महावितरणच्या विश्रामबाग येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. यावेळी खा. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. नितीन शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
खाौ पाटील म्हणाले, थकबाकीपोटी महावितरणकडून वीज तोडण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. ती तत्काळ थांबविण्यात यावी. जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात घरगुती वीज बिलांचे वाटप केले आहे. वीज बिल वसुलीला स्थगिती दिल्यानंतरही कसे वाटप केले जाते? महावितरणच्या मनमानीमुळे नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना आणि महापुरामुळे लोक पिचलेले आहेत, त्यामुळे तत्काळ वसुली थांबविण्यात यावी, कोणत्याही भागातील वीज तोडणी करू नये. वीज तोडण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
चौकट
थकबाकीसाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक
महावितरण कंपनीने थकबाकीच्या वसुलीसाठी शेती, घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. ती थांबविण्यासाठी महावितरण कंपनीला काही रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा केली आहे. उद्या, शुक्रवारी दि. ३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे खासदार, आमदारांची बैठक घेण्यात येणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.