एमआयडीसीतील जागांची लिलाव प्रक्रिया थांबवावी

By Admin | Updated: September 21, 2015 00:06 IST2015-09-20T22:36:16+5:302015-09-21T00:06:49+5:30

चेंबरची मागणी : प्रचलित दरासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घालणार साकडे

Stop the auction process for MIDC seats | एमआयडीसीतील जागांची लिलाव प्रक्रिया थांबवावी

एमआयडीसीतील जागांची लिलाव प्रक्रिया थांबवावी

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाकडून मिरज व कुपवाड एमआयडीसीमध्ये सध्या प्रचलित दरापेक्षा अधिक दराने जागांची लिलाव प्रक्रिया राबविण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांची फसवणूक होणार असून उद्योजकांना उद्योग उभारणे अवघड होणार आहे. तरी औद्योगिक विकास महामंडळाने ही लिलाव प्रक्रिया त्वरित थांबवून प्रचलित दराने प्रक्रिया राबवावी, असे साकडे कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे घालण्यात आले आहे. जिल्ह्यात गेली अनेक वर्षे नव्याने एमआयडीसी निर्माण झाली नसल्यामुळे सध्या उद्योग उभारण्याची इच्छा असलेले नवउद्योजक आणि विस्तारासाठी सज्ज असलेल्या उद्योजकांसमोर जागेचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. तशातच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून सध्या मिरज व कुपवाड एमआयडीसीमध्ये जागांची लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे. त्याची दर प्रक्रिया निविदेमधून प्रचलित दरापेक्षा अधिक दराने राबविण्यास सांगून औद्योगिक विकास महामंडळाने उद्योजकांची फसवणूक सुरू केली आहे. याप्रकरणी उद्योजकांमधून तीव्र स्वरूपात नाराजी उमटली आहे. कृष्णा व्हॅली चेंबरला ही दरवाढ वर्तमानपत्रामधून प्रसिध्द झालेल्या निविदेमधूनच समजली आहे. त्यानंतर या निविदा प्रक्रियेबाबत उद्योजकांमधून उमटलेल्या नाराजीची दखल घेऊन कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयडीसीच्या छुप्या व्यापारी धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या वाढवून ठेवलेल्या निविदा प्रक्रियेमुळे नवउद्योजकांबरोबरच उद्योग विस्तारासाठी सज्ज असलेल्या उद्योजकांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे चेंबरने या निविदा प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवून, महामंडळाने राबविलेली ही प्रक्रिया त्वरित थांबविण्याबरोबरच मिरज व कुपवाडमधील जागांचे दर कोणत्याआधारे निश्चित केले आहेत, याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरला कळविण्याची मागणी बैठकीत केली.
बैठकीस कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, संचालक अनंत चिमड, दीपक मर्दा, जयपाल चिंचवाडे, रतिलाल पटेल, गुंडू एरंडोले, हरिभाऊ गुरव, विपुल शहा, व्यवस्थापक बी. एस. सूर्यवंशी यांच्याबरोबरच उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)

व्यापारीकरणामुळे नाराजी
चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू म्हणाले की, सध्या प्रचलित दरापेक्षा अधिक दराने ही जागांची लिलाव प्रक्रिया राबविण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे उद्योजकांची फसवणूक होणार आहे. प्रचलित दराने प्रक्रिया राबविल्यास उद्योजकांना जागांची किंमत परवडेल तसे ते दर भरतील. निविदेमध्ये जागांना जादा दर आल्यास एमआयडीसीचा फायदाही होईल. परंतु, औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योगवाढीला प्रोत्साहन देण्यापेक्षा छुप्या व्यापारिकरणाची घेतलेली भूमिका त्वरित थांबविण्यात यावी.

Web Title: Stop the auction process for MIDC seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.