इस्लामपुरातील गाळे लिलावाची प्रक्रिया थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:22+5:302021-09-03T04:27:22+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया अन्यायकारक असून, पालिका प्रशासनाने ती थांबवावी, अन्यथा त्याविरुद्ध ...

इस्लामपुरातील गाळे लिलावाची प्रक्रिया थांबवा
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया अन्यायकारक असून, पालिका प्रशासनाने ती थांबवावी, अन्यथा त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय गाळाधारक कृती समितीने घेतल्याची माहिती वैभव कोकाटे आणि प्रसाद नलवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकाटे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही पालिकेचे गाळे घेऊन व्यवसाय करीत आहोत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आणि आता येऊन गेलेल्या महापुरामुळे सगळा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे पूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने कर्ज थकले, व्याजाचा बोजा वाढला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवले आहे.
ते म्हणाले, आम्ही ज्या परिसरात व्यवसाय करतो, तो व्यापारी पेठ म्हणून विकसित झालेला नाही. न्यायालय आणि त्यानंतर तहसीलदार कचेरी शहराबाहेर गेली होती, त्या काळातही येथील व्यवसाय कोलमडून गेला होता. आता पालिका प्रशासनाने गाळ्यांचा लिलाव घेण्याची तयारी चालवली आहे. त्यामध्ये गाळेधारक चिरडले जाणार आहेत. आवाक्याबाहेरची अनामत आणि महिन्याचे भाडे न परवडणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने गाळेधारकांना विश्वासात घेऊन प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ.
यावेळी श्रीराम पाटील, आशिष माटेकर, ॲड. पराग खोत, राजेंद्र सांभारे, शरद मस्के, बबलू पाटील व इतर गाळेधारक उपस्थित होते.