भिलवडीत महावितरणचा मनमानी कारभार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:33+5:302021-05-22T04:24:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार तत्काळ सुधारण्याची गरज आहे. ...

भिलवडीत महावितरणचा मनमानी कारभार थांबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी
: भिलवडी (ता. पलूस) येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार तत्काळ सुधारण्याची गरज आहे. भारनियमनानंतरही शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होत नाही. याकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले की, महावितरणाच्या भिलवडी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे रोहित्र जळणे, तांत्रिक दोष काढण्यासाठी कर्मचारी दोन दिवसांतूनही तेथे पोहोचत नाही. अगाप सोयाबीनची लागवड सुरू आहे. ऊस पिकास उन्हाळ्यात वारंवार पाणी द्यावे लागत आहे. भिलवडी व परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणाकडे सुरळीत वीजपुरवठा व्हावा व होणारे नुकसान थांबवावे यासाठी अनेक वेळा तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. वेळेत वीज पुरवठा होत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. महावितरणने अपुरी कर्मचारी संख्या असल्याने अत्यावश्यक सेवा म्हणून तत्काळ कर्मचारी भरती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम पाटील, भिलवडीचे माजी सरपंच शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील, कुमार पाटील, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.