जिल्ह्यात १२ बसेसवर दगडफेक
By Admin | Updated: June 10, 2014 02:11 IST2014-06-10T01:51:22+5:302014-06-10T02:11:53+5:30
एस. टी. बसच्या फेऱ्या रद्द : कर्नाटक वाहतूक बंद; बंदोबस्त वाढविला

जिल्ह्यात १२ बसेसवर दगडफेक
सांगली/मिरज : फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे पडसाद आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात उमटले. सांगली, मिरज आणि इस्लामपूर परिसरात पुन्हा एसटी बसेसना टार्गेट करून अज्ञातांनी दिवसभरात बारा बसेसवर दगडफेक केली. एस.टी.च्या जिल्ह्यातील अनेक फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या. अफवा, दगडफेकीमुळे कर्नाटक एस.टी.ची वाहतूक दिवसभर बंद होती.
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगली-कुरुंदवाड बसवर चौघांनी दगडफेक केली. त्यानंतर सिव्हील चौकात जत-कोल्हापूर व विटा-सांगली या दोन बसेसवर दगडफेक करून घोषणा देत संशयितांनी पलायन केले. या तिन्ही घटना एकाचवेळी घडल्याने शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दगडफेकीत तिन्हीही बसेसचे प्रत्येकी पंधरा हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज व ग्रामीण भागात एसटीवर दगडफेकीचे सत्र आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. मिरज, नरवाड व परिसरात सहा बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने एसटीच्या १६४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कर्नाटक एसटीची वाहतूक दिवसभर बंद होती. काल, रविवारी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. रात्री मुक्कामाला जाणाऱ्या व आज सकाळी येणाऱ्या सहा बसेसवर अज्ञातांनी दगडफेक करून पलायन केले. मिरज आगारातून फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मिरज एसटी आगाराचे तीन लाख १५ हजारांचे उत्पन्न बुडाले. कर्नाटक सीमाभागातही बंद असल्याने कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बसेस बंद होत्या. मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या २० व कर्नाटकातून येणाऱ्या १५३ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने दिवसभर महाराष्ट्र-कर्नाटक एसटी वाहतूक बंद होती. (प्रतिनिधी)