एका दगडाने बिघडले त्याच्या जगण्याचे गणित

By Admin | Updated: June 19, 2014 00:57 IST2014-06-19T00:56:00+5:302014-06-19T00:57:23+5:30

सांगलीतील घटना : दंगलखोरांनी एसटीवर केलेल्या दगडफेकीचा फटका निष्पाप तरुणाला

A stone broke his math of his life | एका दगडाने बिघडले त्याच्या जगण्याचे गणित

एका दगडाने बिघडले त्याच्या जगण्याचे गणित

अविनाश कोळी
सांगली
एका बेसावध क्षणी एक दगड भिरभिरत आला... एसटी बसला लक्ष्य करत धडकून परतला आणि वाहनावरून चाललेल्या एका तरुणाच्या डोक्याला बंदुकीच्या गोळीप्रमाणे दणका देऊन विसावला... हा दणका इतका जोराचा होता की, तो जागीच कोसळला... रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले... जगण्यासाठी त्याची तडफड सुरू झाली... एका किचकट शस्त्रक्रियेनंतर त्याला जीवदान मिळाले, पण त्याच्या जगण्याचे गणितच या दगडाने बिघडवून टाकले.
फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केल्याच्या वृत्ताने दहा दिवसांपूर्वी सांगलीतील वातावरण बिघडले होते. या घटनेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा अनेकांना त्याची शिक्षा मिळण्यास सुरुवात झाली. अशीच शिक्षा सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील आप्पासाहेब चंद्रकांत म्हारगुडे (वय २३) हा तरुण आणि त्याचे कुटुंबीय भोगत आहेत.
८ जून २०१४ ची सायंकाळ... वातावरणात तणाव असला तरी शहरातील रस्त्यांवर वाहतूक सुरळीत होती. सांगलीच्या डॉ. आंबेडकर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या मित्राला जेवणाचा डबा देण्यासाठी आप्पासाहेब चुलत भावासमवेत दुचाकीवरून चालला होता. सम्राट व्यायाम मंडळासमोरील रस्त्यावर एका एसटी बसलगतच तो होता. सायंकाळचे साडेसात वाजले होते. वेगाने भिरभिरत एक दगड त्या बसच्या दिशेने आला. बसच्या पत्र्याला लागून तो तसाच परतला आणि त्याने आप्पासाहेबाला लक्ष्य केले. एका क्षणात त्याच्या डोक्यावर मोठा आघात झाला. काही कळण्याच्या आतच तो कोसळला. केबल वाहिन्यांसाठी रस्ते खुदाई झाल्यामुळे तो आणखीनच जोरात कोसळला. डोक्याला मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. सोबत असलेल्या चुलत भावाने त्याच्या मित्रांना याची कल्पना दिली. जवळच्या रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. कवटीला जोरात मार लागल्याचे दिसल्याने त्यांनी त्यास मिरजेला मिशन हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना केली.
दगडाचा वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्याच्या मित्रांनी पैशाची तजवीज केली आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र यानिमित्ताने त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले.

Web Title: A stone broke his math of his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.