जिभेच्या चोचल्यांमुळे पोटाचे रोग, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे अल्सरचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:01+5:302021-09-04T04:31:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : रस्त्यावरील चमचमीत आणि तिखट, मसालेदार पदार्थांचा मोह तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतो, असा इशारा ...

जिभेच्या चोचल्यांमुळे पोटाचे रोग, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे अल्सरचा त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रस्त्यावरील चमचमीत आणि तिखट, मसालेदार पदार्थांचा मोह तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. शरीराला हानीकारक घटक पदार्थांमध्ये वापरल्याने त्याची परिणती अल्सरमध्ये होऊ शकते.
रस्त्याकडेचे हातगाडे, खाऊगल्ल्या आणि हाॅटेलमधील खाणे प्रतिष्ठेचे बनत असले, तरी त्यातून नानाप्रकारच्या रोगांना आपण पोटात घेत असतो, हे लक्षात ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. विशेषत: चायनीज पदार्थांमधून पोटात जाणारा अजिनोमोटो अत्यंत घातक असल्याने टाळणेच योग्य ठरते.
बॉक्स
या विकारांना तोंड द्यावे लागेल
पोटदुखी, उलट्या, हगवण, वजन अचानक कमी होऊ लागणे, अपचन, बद्धकोष्ठता, मूळव्याध, पित्ताचा त्रास, झोपेच्या तक्रारी
बॉक्स
घरचे खा, गरम गरम खा
- हॉटेलमधील खाण्याऐवजी घरात बनवलेले पदार्थ खाणेच नेहमी आरोग्यदायी ठरते, असे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
- हॉटेलमधील मेनू घरातही बनवल्यास हॉटेलमधील खाण्याचा आनंद अधिक आरोग्यदायीपणे अनुभवता येईल.
- पदार्थ नेहमी गरम असतानाच खाण्याने अधिकाधिक जीवनसत्त्वे पोटात जातात. त्यापासून अपायकारक विकार उद्भवत नाहीत.
कोट
हॉटेल किंवा रस्त्यांवरील पदार्थांसोबत आपण अनेक आजार पोटात घेत असतो. जिभेचे चोचले पुरविताना पोटामध्ये अनेक आजारांना प्रवेश देत असतो. अल्सर, मूळव्याध अशा विकारांची यातून सुरुवात होते. हॉटेलातील चायनीज खाण्याने पोटाचे विकार सुरू होतात. त्यामुळे घरात बनविलेल्या पदार्थांनाच पसंती द्यावी. हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे.
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली