शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हा परिषद आवारात तात्काळ उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:14+5:302021-03-31T04:27:14+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या इमारतीपुढील प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद केली ...

शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हा परिषद आवारात तात्काळ उभारणार
सांगली : जिल्हा परिषदेच्या इमारतीपुढील प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. चबुतऱ्याचे काम लगेच सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंगळवारी घेण्यात आला. पंचवीस-पंधरा योजनेतून दहा कोटींचे प्रस्ताव पाठवून पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा मंगळवारी झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा जिल्हा परिषद प्रांगणामध्ये बसविण्याच्या कामास परवानगी दिली. इतर कामांना गती यावी, यासाठी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. यामध्ये समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सदस्य संभाजी कचरे, नितीन नवले व कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. चबुतऱ्यासाठी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. लगेच निविदा काढण्यात येणार आहे. २५:१५ अंतर्गत विविध विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून पालकमंत्री जयंत पाटील तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रस्ताव घेऊन पाठविण्याचे निर्णय घेण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. माधवनगर येथे २५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली.
चौकट
शेळीपालनासाठी ७५ टक्के अनुदान
शेळीपालन अनुदान योजनेतून १० शेळ्या व एका बोकडास ५० टक्के अनुदान दिले जात होते. आता यात शेळ्यांची संख्या कमी करून अनुदान ७५ टक्के करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्यास २२ हजार ५०० रुपये अनुदान व सात हजार ५०० लाभार्थ्याचा हिस्सा, असे या योजनेचे स्वरूप राहणार आहे. २२२ जणांना अनुदान मिळणार आहे.