एलबीटीप्रश्नी २६ पासून राज्यव्यापी संघर्ष
By Admin | Updated: March 22, 2015 00:26 IST2015-03-22T00:26:57+5:302015-03-22T00:26:57+5:30
व्यापाऱ्यांचा निर्णय : आंदोलनास सांगलीतून प्रारंभ; बेमुदत उपोषण, कर भरण्यावर बहिष्कार

एलबीटीप्रश्नी २६ पासून राज्यव्यापी संघर्ष
सांगली : एलबीटीप्रश्नी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगलीतील व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसून केलेल्या वसुलीच्या कारवाईनंतर हा प्रश्न आणखी चिघळला. येथील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत येत्या गुरुवारपासून बेमुदत उपोषण आणि करावर बहिष्काराचा निर्णय घेतला.
‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांच्यासह राज्यातील व्यापारीही सांगलीतील आंदोलनात सहभागी होणार असून, शासन आणि महापालिकांविरोधातील राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात सांगलीतून करण्यात येणार आहे.
येथील पाटीदार भवनात शुक्रवारी रात्री एलबीटीविरोधी कृती समितीची बैठक झाली. शुक्रवारी दुकानामध्ये घुसून दमदाटी करून एलबीटीची वसुली केल्याप्रकरणी महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील यांचा निषेध करण्यात आला. दुकानात घुसणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. राज्य शासनानेही एलबीटीप्रश्नी फसवणूक केल्याने एकाचवेळी राज्य शासन व सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या गुरुवारी ( दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता गणपती मंदिरापासून व्यापारी दुचाकी रॅली काढणार आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवरून ती मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या शाळा क्र. १ जवळच्या इमारतीसमोर उपोषण स्थळी येईल. तेथे बेमुदत उपोषणास सुरुवात होणार आहे.
महापौर, उपमहापौरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक होईपर्यंत व्यापाऱ्यांनी एलबीटी भरू नये, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. सांगलीतील आंदोलनात ‘फॅम’चे (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्ट्र) अध्यक्ष मोहन गुरनानी सहभागी होणार आहेत. त्यानंतर राज्यातील अन्य महापालिकांमधील व्यापारीही टप्प्याटप्प्यांने सहभागी होणार आहेत.
यावेळी समीर शहा, विराज कोकणे, आप्पा कोरे, नितीन शहा, धीरेन शहा, सोमेश्वर बाफना, सुरेश पटेल, अनंत चिमड, शिवाजीराव पाटील, मुकेश चावला, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज्य शासनाचा निषेध
शासनानेही एलबीटी हटविताना त्याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. त्यामुळे बैठकीत युती सरकारचा निषेध करण्यात आला. एप्रिलपासून एलबीटी हटविण्याबाबतचे आश्वासन देताना आॅगस्टपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबतचा अध्यादेश जोपर्यंत काढला जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील, असा इशारा व्यापाऱ्यांनी यावेळी दिला.
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दहशतीने वसुलीचा प्रकार शुक्रवारी केला. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. अशाप्रकारे वसुली करून पदाधिकारी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाकडूनही एलबीटीप्रश्नी फसवणूक झाली आहे. त्यामुळे यापुढे व्यापाऱ्यांचे प्रश्न पूर्णपणे सुटेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. यापुढे जी परिस्थिती उद्भवेल त्याला हेच पदाधिकारी जबाबदार असतील.
- समीर शहा, नेते, एलबीटीविरोधी कृती समिती, सांगली
हा कर महापालिकेने किंवा महापौरांनी लादलेला नाही. शासनाने केलेल्या कायद्याप्रमाणे करवसुली सुरू आहे. नागरिकांच्या खिशातून पैसे गोळा करून संबंधित व्यापाऱ्यांनीच गुन्हा केला आहे. त्यामुळे आमच्या अटकेची मागणी म्हणजे ‘चोर ते चोर आणि वर शिरजोर’ असा प्रकार आहे. नागरिकांना सध्या ज्या गैरसोयींचा सामना करावा लागतो, तो अशा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांमुळेच. त्यामुळे सुजाण व्यापाऱ्यांनी तत्काळ कर भरावा.- विवेक कांबळे, महापौर, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका