ओबीसी आरक्षणासाठी लोणावळा येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:23+5:302021-06-20T04:19:23+5:30
सांगली : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय चिंतन शिबिर शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) लोणावळा येथे आयोजित केले आहे. ...

ओबीसी आरक्षणासाठी लोणावळा येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर
सांगली : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय चिंतन शिबिर शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) लोणावळा येथे आयोजित केले आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. ओबीसी संघटनेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी ही माहिती दिली.
प्रत्येक दिवशी चार अभ्यासकांची व्याख्याने होतील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणातील कायदेशीर अडचणी, देशभरातील ओबीसी समाजापुढील समस्या, मंडल आयोगातील ओबीसींसाठीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीतील अडचणी, ओबीसी जनगणनेतील राजकीय अडथळे, आदी विषयांवर विचारमंथन होईल. दुसऱ्या दिवशी माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार आहेत. या शिबिरातील महत्त्वाचे ठराव मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांना पाठविले जाणार आहेत.
खरमाटे म्हणाले की, आरक्षणाच्या विषयावरून ओबीसी व अन्य समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. संविधानाने दिलेले आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. आमच्या वाट्याचे व हक्काचे आरक्षण मिळायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींना राजकारणातून बाहेर हाकलण्याचा हा प्रयत्न आहे. याविरोधातही कायदेशीर लढा दिला जाईल. प्रसंगी समाज रस्त्यावरही येईल.
यावेळी शशिकांत गायकवाड, सुनील गुरव, नंदकुमार नीळकंठ, अर्चना सुतार, राजश्री मालवणकर, आदी उपस्थित होते.
चौकट
शिबिराला ३०० सदस्य येणार
लोणावळ्यातील चिंतन शिबिरासाठी राज्यभरातून ३०० प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाविषयक नियमांचे पालन करत शिबिर पार पडेल. ओबीसी आरक्षणासाठीच निर्णायक दिशा शिबिरात निश्चित होईल, असे खरमाटे यांनी सांगितले.