मांजर्डे येथे १ पासून राज्यस्तर कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: December 29, 2014 23:39 IST2014-12-29T22:32:50+5:302014-12-29T23:39:50+5:30
गेल्या ३० वर्षांपासून मंडळातर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे

मांजर्डे येथे १ पासून राज्यस्तर कबड्डी स्पर्धा
मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेच्यावतीने सुभाषराव पाटील व विलासराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिंमित्त १ जानेवारीपासून ४० व ६० किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक दिनकर पाटील व अध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिली.
या स्पर्धेबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून मंडळातर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही संस्थेच्या क्रीडांगणावर होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे उद्घाटन कवठेमहांकाळचे विभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक रमेश बनकर, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. रामदास हजारे, भूपाल पाटील, चंद्रसेन पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
दोन्ही गटातील विजेत्या संघांना रोख बक्षिसे, त्याचप्रमाणे वैयक्तिक कौशल्याची बक्षिसेही दिली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी गृहमंत्री व आमदार आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बाबर, हेमंत निकम (प्रांताधिकारी मिरज), विश्वासराव माने-पाटील (उपसभापती, पं. स. तासगाव), डी. के. पाटील (माजी अध्यक्ष, जि. म. बॅँक), अनिल पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), राजाराम पाटील (अध्यक्ष, रामानंद भारती सूतगिरणी), संजय पाटील, अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)